Sun, Mar 24, 2019 08:16होमपेज › Ahamadnagar › मुख्यमंत्री न्याय देणार का

मुख्यमंत्री न्याय देणार का

Published On: Jan 01 2018 1:52AM | Last Updated: Dec 31 2017 10:36PM

बुकमार्क करा
कर्जत : गणेश जेवरे

तुकाईचारीसाठी मागील 10 महिन्यांपासून कर्जत तहसील कार्याल यासमोर आंदोंलन करणारे वृध्द सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सूर्यवंशी यांना मुख्यमंत्री भेटणार का? याबाबत तालुक्यात उत्सुकता निर्माण झाली आहे. तालुक्यातील 21 गावांसाठी वरदान ठरणारी ‘तुकाई चारी’ होण्यासाठी कर्जत तालुक्यातील गुुरवपिंपरी येथील वयोवृध्द सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब त्रिंबक सूर्यवंशी मागील 10 महिन्यांपासून तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह करीत आहेत. या योजनेस मान्यता मिळेपर्यंत  माघार घेणार नाही अशी भिष्म प्रतिज्ञा करणार्‍या या आधुनिक भगिरथाने गावाच्या शिवेमध्ये मागील अकरा महिन्यांपासून प्रवेश केलेला नाही. मुख्यमंत्री आज सूर्यवंशी यांच्या आंदोलनाची दखल घेणार का, असा प्रश्‍न परिसरातील शेतकरी विचारीत आहेत. सूर्यवंशी यांनीही आता ‘करो या मरो’चा नारा दिला आहे. ‘मृत्यू येईपर्यंत माघार नाही’, असा निर्धार ते बोलताना व्यक्त करीत आहेत. 

या संदर्भात सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्र्यांना 9 फेब्रुवारी 2016 रोजी सविस्तर पत्र दिले आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री शिंदे हे मला आणि 21 गावांतील शेतकर्‍यांना न्याय देतील, असा विश्‍वास सूर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात पालकमंत्र्यांनी सूर्यवंशी यांची भेट घेतली. मात्र, ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन मागे घेण्यास सूर्यवंशी यांनी नकार दिला. 10 महिन्यांपासून सूर्यवंशी घरी गेले नाही! तुकाईचारीसाठी सूर्यवंशी अनेक वर्षांपासून संघर्ष करीत आहेत. अखेर त्यांनी तहसील कार्यालयासमोर 5 मार्च 2017 पासून सत्याग्रह सुरू केला आहे. या घटनेस आता 10 महिने उलटत आले आहेत. ते  रोज सकाळी तहसील कार्यालयाच्या आवरात येऊन बसतात आणि कार्यालय बंद झाले की निघून जातात. मात्र ते स्वत:च्या घरी जात नाहीत किंवा गावाच्या वेशीमध्येही जात नाहीत. त्यांचे आंदोलन पाहून प्रत्येकाच्या मनात सरकारविरूध्द क्रोध निर्माण होत आहे.