Fri, Jul 10, 2020 22:23होमपेज › Ahamadnagar › विजेसाठी शेतकर्‍यांनी रोखला महामार्ग

विजेसाठी शेतकर्‍यांनी रोखला महामार्ग

Published On: Dec 22 2017 1:24AM | Last Updated: Dec 21 2017 11:04PM

बुकमार्क करा

करंजीः वार्ताहर

शेतकर्‍यांच्या शेतीपंपाचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने अचानक बंद केल्यानंतर त्रिभुवनवाडी, आठरे कौडगाव, निंबोडी, जोहारवाडी, मांडवे  येथील संतप्त शेतकर्‍यांनी कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावरील त्रिभुवनवाडीफाटा येथे गुरुवारी सकाळी सुमारे अडीच तास रास्तारोको आंदोलन केले.

जोपर्यंत शेतीपंपाचा वीजपुरवठा सुरू केला जाणार नाही, तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही अशी आक्रमक भूमिका आंदोलक शेतकर्‍यांनी घेतल्याने उपस्थित वीज मंडळाचे अधिकारी देखील काही वेळ गोंधळून गेले.परंतु आंदोलन चिघळू नये म्हणून नायब तहसीलदार कुलकर्णी व उपअभियंता आडभाई यांनी वीजपुरवठा लगेच सुरू करू, असे तोंडी आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

त्रिभुवनवाडीफाटा (ता.पाथर्डी) येथे झालेल्या रस्तारोको आंदोलनाचे नेतृत्व प्रदेश काँग्रेसचे सदस्य संभाजी वाघ यांनी केले. यावेळी झालेल्या आंदोलनाप्रसंगी वाघ यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली. वाघ म्हणाले, तीन वर्ष झाले अच्छे दिन आले नाहीत. देशात हजारो कोटींचे घोटाळे होतात अन् ते निर्दोषही सुटतात मग दोन पाच हजाराकरीता शेतकर्‍यांचे बारे बंद करण्याचे काम वीजमंडळ करत आहे. चार वर्षानंतर दुष्काळ हटालाय, घेतलेले पीक अजूनही शेतातच आहेत तोच वीज कंपनीने पठाणी वसुली सुरू केली आहे.  बंद केलेला शेतीपंपाचा वीजपुरवठा तत्काळ सुरू करा, अन्यथा आम्ही सर्व शेतकरी रस्त्यावरून उठणार नाही, अशी भूमिका आंदोलकांच्यावतीने संभाजी वाघ, खांडगावचे उपसरपंच मच्छिंद्र सावंत, कौडगावचे माजी सरपंच पृथ्वीराज आठरे, सरपंच रेणूका शेरकर,ज्योतीबा आठरे,ज्येष्ठनेते आण्णासाहेब भापसे, कान्हू म्हस्के, रमेश कारखेले, रामेश्‍वर आठरे, शिवाजी कारखेले, दिनकर कारखेले, सुधाकर म्हस्के, नामदेव कारखेले , संजय कारखेले, रघुनाथ कारखेले  यांनी घेतली.  

उपअभियंता आडभाई यांनी  कौडगाव जवळच्या चारच गावांचा विजपुरवठा बंद केलेला नाही तर तालुक्यातील 44 गावांचा शेतीपंपाचा विजपुरवठा बंद केलेला आहे. या चार गावांचा आत्ता जरी वीजपुरवठा सुरू केला तरी शेतकर्‍यांना थकबाकीपोटी पैसे भरावेच लागणार आहेत. लोकशाही मार्गाने आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न कोणी केला तर कोर्टकचेरीचा संपूर्ण खर्च आम्ही करू. कोणीही घाबरुन जाण्याची गरज नाही असे सरपंच  मच्छिंद्र सावंत व पृथ्वीराज आठरे यांनी सांगितले. अडीच तास सुरू राहिलेल्या या रस्तारोकोमुळे महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा बाजूने सुमारे दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.