Wed, Mar 20, 2019 22:54



होमपेज › Ahamadnagar › गिर्‍हे, मोकळेच्या पोलिस कोठडीत वाढ

गिर्‍हे, मोकळेच्या पोलिस कोठडीत वाढ

Published On: Apr 22 2018 1:11AM | Last Updated: Apr 22 2018 12:09AM



नगर : प्रतिनिधी

केडगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपी संदीप गिर्‍हे, महावीर मोकळे या दोघांच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. 14 दिवसांपासून पोलिस कोठडीत असलेल्या संदीप गुंजाळ व गावठी कट्टा पुरविणारा बाबासाहेब केदार या दोघांची रवानगी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. 

चार आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत काल (दि. 21) संपत असल्याने त्यांना दुपारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती सो. सु. पाटील यांच्यासमोर हजर करण्यात आले. तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक दिलीप पवार व सरकारी वकील अ‍ॅड. सीमा देशपांडे यांनी न्यायालयात म्हणणे सादर केले की, गिर्‍हे व मोकळे या आरोपींनी पळून जाण्यासाठी वापरलेले वाहन हस्तगत करायचे आहे. त्यांनी खुनावेळी घटनास्थळी असल्याचे कबूल केलेले आहे. आता कसा कट रचला व त्यात कोणा-कोणाचा सहभाग आहे, हे तपासायचे आहे. गुन्ह्याचे स्वरुप गंभीर असून, आरोपी टप्प्याटप्याने कबुली देत आहेत. फरार आरोपींना अटक करणे व त्यांचा गुन्ह्यातील सहभागी निष्पन्न करणे आदींसाठी या दोनही आरोपींना पोलिस कोठडी देण्यात यावी. संदीप गुंजाळ व बाबासाहेब केदार या दोघांना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

आरोपीच्या वकिलांनी गुन्ह्याच्या तपासात प्रगती नसल्याचा दावा करून पोलिस कोठडी देण्यात येऊ नये, असा बचाव केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने गिर्‍हे व मोकळे या दोघांना बुधवारपर्यंत (दि. 25) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. तसेच इतर दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. मयत संजय कोतकर यांच्याशी वाद घातलेला व गुन्ह्यात महत्त्वपूर्ण सहभाग असलेल्या रवी खोल्लम हा सध्या पोलिस कोठडीत आहेत. त्याचीही कसून चौकशी सुरू आहे. 

न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर गुंजाळ व केदार या दोघांची रवानगी औरंगाबाद येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. त्यांना पोलिस बंदोबस्तात सायंकाळी न्यायालयाच्या परवानगीने औरंगाबादला हलविण्यात आलेले आहे.