Sun, Mar 24, 2019 06:12होमपेज › Ahamadnagar › राहुरीत धूमस्टाईलने दहा तोळ्यांचे दागिने पळविले

राहुरीत धूमस्टाईलने दहा तोळ्यांचे दागिने पळविले

Published On: Jan 15 2018 1:40AM | Last Updated: Jan 14 2018 10:50PM

बुकमार्क करा
राहुरी : प्रतिनिधी 

राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक, तसेच राहुरी शहरात अज्ञात चोरट्यांनी धूमस्टाईलने दोन महिलांच्या गळ्यांतील प्रत्येकी पाच तोळ्यांचे दागिने ओरबाडून पोबारा केल्याने महिलांत प्रचंड घबराट पसरली आहे. 

मोनिका धनंजय विटनोर (राहुरी फॅक्टरी) या काल दुपारी 3.30 वाजता वैष्णवी चौक येथील मंदिरात मकार संक्रातीनिमित्त दर्शनासाठी गेल्या होत्या. मंदिर स्थळी महिलांची मोठी गर्दी जमलेली होती. याप्रसंगी अज्ञात चोरट्यांनी महिलांची गर्दी हेरत मोनिका विटनोर यांच्याकडे दुचाकीवर भरधावे येत त्यांच्या गळ्यातील 5 तोळ्यांचे गंठण ओरबाडून धूम ठोकली. चैतन्य उद्योग समुहाचे अध्यक्ष गणेश भांड यांनी घटनास्थळी जाऊन गंठण चोरी टोळीस तात्काळ जेरबंद करावे, अशी मागणी केली.

दरम्यान, राहुरी फॅक्टरीच्या घटनेनंतर दुपारी 4 वाजता राहुरी येथील आनंदऋषीजी उद्यानातील गणेश मंदिराचे दर्शन घेऊन घरी परतणार्‍या सुनिता अशोक खेळेकर यांच्या गळ्यातील 5 तोळे सोन्याचे गंठण धूमस्टाईलने पळविल्याची दुसरी घटना घडल्याने राहुरीतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर आला.