Fri, Apr 26, 2019 10:04होमपेज › Ahamadnagar › जेजुरी गडावर भाविकांची मोठी गर्दी 

जेजुरी गडावर भाविकांची मोठी गर्दी 

Published On: Feb 14 2018 2:49AM | Last Updated: Feb 13 2018 11:46PMजेजुरी :नितीन राऊत

महाशिवरात्रीनिमित्त सार्‍या महाराष्ट्राचे कुलदैवत व बहुजन समाजाचे लोकदैवत असणार्‍या खंडोबा देवाच्या जेजुरी गडाच्या  मंदिरात व शिखरावर असणार्‍या स्वर्गलोकी, भूलोकी, व पाताळलोकी ( त्रैलोक्य) या शिवलिंगाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या भाविकांनी  गर्दी केली होती.  मंगळवारी पहाटेपासून सुमारे लाखभर भाविकांनी देवदर्शन घेतले.  जेजुरीत महाशिवरात्री यात्रेला येथे वेगळे महत्त्व आहे.  जेजुरी गडाच्या मुख्य 

मंदिरावरील शिखरात असणारे शिवलिंग हे स्वर्गलोकी शिवलिंग मानले जाते.  तर गडावरील मुख्य मंदिरातील स्वयंभू लिंग हे भूलोकी शिवलिंग मानले जाते आणि गाभार्‍यातील मुख्य मंदिराशेजारी असणार्‍या गुप्त मंदिरातील तळघरात असणारे शिवलिंग पाताळलोकी शिवलिंग मानले जाते.   मुख्य मंदिरातील स्वयंभू शिवलिंग हे दर्शनासाठी रोज खुले असते; तर मंदिराच्या शिखरावरील व मुख्य मंदिरातील तळघरातील शिवलिंग हे केवळ वर्षातून एकदा  महाशिवरात्री दिवशी दर्शनासाठी उघडले जाते.  महाशिवरात्रीला जेजुरी गडावर त्रैलोक्य शिवलिंग दर्शनाची मोठी पर्वणी असल्याने हजारो भाविक हा लाभ घेण्यासाठी मोठी गर्दी करीत असतात. वर्षातून फक्त एकदाच गुप्त मल्लेश्वराचे दर्शन होत असल्याने भाविकांची अलोट गर्दी होते.    

महाशिवरात्रीला भूलोक , पाताळलोक व स्वर्गलोक अशा तीनही लोकांचे एकाच दिवसात दर्शन होत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे,  अशी माहिती खंडोबा देवाचे अभ्यासक सचिन उपाध्ये यांनी दिली. महाशिवरात्रीनिमित्त मंगळवार दि. 13 रोजी मध्यरात्री 12 वाजता शिखरावरील व मंदिराच्या तळघरातील शिवलिंग उघडण्यात आले.  पहाटे एक वाजता मानकरी, ग्रामस्थ यांची महापूजा व अभिषेक झाल्यानंतर भाविकांना त्रैलोक्य शिवलिंग दर्शन खुले करण्यात आले.  दर्शनासाठी पहाटे एकपासून हजारो भाविकांनी जेजुरी गडावर रांगा लावल्या होत्या. दिवसभर हजारो भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले.  हार,  बेल,  पाने, दवणा, फुले याबरोबरच देवाचे लेणं असणारा भंडार-खोबरे देवाला अर्पण करण्यात आले.  

दुपारी अडीचच्या सुमारास खासदार सुप्रिया सुळे यांनी गडावर येऊन खंडोबा देवाबरोबरच त्रैलोक्य शिवलिंगाचे दर्शन घेतले.   महाशिवरात्री उपवासानिमित्त जेजुरी देवसंस्थान तसेच अनेक भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले.  देवसंस्थानच्या वतीने सुलभ दर्शन, पाणी, स्वच्छता आदी सुविधा पुरविण्यात आल्या, तर जेजुरी पोलिस स्टेशनचे निरीक्षक डी. एस.  हाके, पोलिस उपनिरीक्षक राजेश मालेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.    दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीच्या दुसर्‍या दिवशी म्हणजेच बुधवार दि. 14 रोजी रात्री बारापर्यंत जेजुरी गडावरील त्रैलोक्य शिवलिंग दर्शन भाविकांसाठी खुले राहणार आहे.