Tue, Jul 23, 2019 06:16होमपेज › Ahamadnagar › जिल्ह्याचा ‘समन्वयक’ हरपला

जिल्ह्याचा ‘समन्वयक’ हरपला

Published On: Feb 20 2018 1:21AM | Last Updated: Feb 20 2018 12:17AMविष्णू वाघ

कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसताना युवक मंडळाच्या माध्यमातून सामाजिक-राजकीय क्षेत्रांत काम करणारे जयंतराव मुरलीधर ससाणे यांनी स्वकर्तृत्वाने स्वत:चा इतिहास रचला. शेतकरी संघटनेच्या आंदोलनातील तुरुंगवासापासून सर्वसामान्यांचा नेता म्हणून त्यांनी लौकिक मिळविला. 10 वर्षे नगराध्यक्ष व 10 वर्षे श्रीरामपूरचे आमदार म्हणून काम करताना श्री साईबाबा संस्थानचे सलग साडेसात वर्षे अध्यक्ष राहिलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंतराव ससाणे यांच्या निधनाने जिल्हा, राज्य व देशातील एक ‘समन्वयक’ हरपला असल्याची घटना सर्वांना हूरहूर लावून गेली आहे. 

गेल्याच आठवड्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण एका कार्यक्रमानिमित्त राहाता येथे आले असता, जिल्ह्यात काँग्रेसला मोठे यश संपादन करायचे असेल, तर ‘समन्वया’ची गरज असल्याची खंत व्यक्त केली होती. त्यामुळे काँग्रेसमध्ये ‘समन्वयक’ म्हणून भूमिका बजावणारे ससाणे यांची पक्षाला किती गरज आहे हे अधोरेखित झाले.

खा. चव्हाण व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांची भेट घेऊन उत्तम आरोग्यासाठी प्रार्थनाही केली होती. परंतु ‘जो आवडे सर्वांना तो आवडे देवाला’ या उक्ति प्रमाणे ससाणे यांनी आपला देह ठेवला. त्यामुळे श्रीरामपूरकरांसाठी सक्षम नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची प्रत्येकाला खंत आहे. संघर्ष आणि संकटांबरोबरच कार्यकर्त्यांशी जुळवून घेऊन पक्षीय राजकारणाच्या व्यासपीठावर यशस्वी झालेले नेते आजमितीला नगर जिल्ह्याच्या राजकारणात अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील, इतकेच आहेत.

त्यात  श्रीसाईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार, तसेच काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष जयंतराव ससाणे यांचे नाव ठळकपणे समोर येते. पक्षीय राजकारणाबरोबरच समाजकारणातही कमालीचा यशस्वी टप्पा गाठणारे अन् स्वतः नंदादीप बनून कार्यकर्त्यांना विचारांचा उजेड देऊन त्यांच्या आयुष्यातील काळोख दूर करणारे जयंतराव ससाणे काळाच्या पडद्याआड गेले आहेत.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेला प्रशस्त जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्ह्याची ओळख सर्वदूर पसरली आहे. या जिल्ह्यातील राजकीय दिग्गजांचा बोलबाला दिल्लीच्या राजसत्तेपर्यंत दखलपात्र ठरला आहे. अशा या बलाढ्य राज्यकर्त्यांच्या भाऊगर्दीत सामान्य कार्यकर्त्यांचे नेतृत्व व कर्तृत्वाचा निभाव लागणे, तशी अशक्यप्राय गोष्ट! मात्र, कामांचा     पाठपुरावा,  प्रशासकीय  योजनांचा अभ्यास व मिठ्ठास स्वभावाच्या आणि मधाळ वाणीच्या शिदोरीवर प्रत्येकाच्या आदर्श व समृद्ध विचारसरणीचे अनुकरण करणारे जयंतराव ससाणे यांचा जीवनपट अनेकांसाठी त्यातच नवोदित राजकारणी व समाजकारण्यांसाठी ‘मॉडेल’ ठरणार आहे.

सतत हसतमुख चेहरा, खळाळून हसताना उमटणारी भावमुद्रा यातूनच ससाणे यांच्या विनम्र स्वभावाची साक्ष पटत होती. जनतेची कामे करताना ज्यांचे कधीही पाय थकले नाही, असे ससाणे म्हणजे जिल्ह्याचे राजकीय समन्वयक, तर कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ‘ताईत’ होते. अगदी राजकारणाच्याही पलिकडे जाऊन अनेकांची झालेली त्यांची मैत्री त्यांच्या सृजनशील विचारांची व सधन संस्काराची साक्ष देणारी होती. राजकारणातील एक ‘भला माणूस’ ही प्रतिमा ससाणे यांनी जाणीवपूर्वक जपली आहे.

आपल्या कामावर आणि कार्यकर्त्यांवर अढळ निष्ठा बाळगणारे ससाणे जिल्ह्यातच नव्हे तर अगदी महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते ठरले होते.तर श्रीसाई संस्थानच्या माध्यमातून त्यांनी उभा केलेला कामाचा डोंगर चक्क जगाच्या पाठीवर देखील हिमशिखरासारखा तेजाने तळपू लागला होता. साईबाबांच्या ‘श्रद्धा अन् सबुरी’ या महामंत्राचे अनुकरण ससाणे यांनी आपल्या जीवनात करीत होते, म्हणूनच अनेकदा राजकारणात चढ-उतार  आल्यानंतर संघर्ष करताना ते कधी हतबल झाले नाहीत.

तर संघर्ष अन् संकटाला हसतमुखाने सामोरे जाऊन त्यांनी त्यावर प्रत्येकवेळी यशस्वीरित्या मात केली. राजकारणात  नगरसेवकपदापासून आपल्या कार्याचा ‘श्रीगणेशा’ करणारे ससाणे यांनी जनसेवा हीच ईश्‍वर सेवा मानली आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा हा नंदादीप अखंडपणे तेजाने तळपत राहून अनेकांसाठी दीपस्तंभ ठरला आहे. ससाणे हे आपल्या अलौकिक गुणांमुळे राजकारण्यांसाठी आदर्श, तर नवोदित कार्यकर्त्यांसाठी आधारवड होते. 
जयंतराव ससाणे यांनी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँगे्रस (आय) चे विधानसभेतील  प्रतिनिधी म्हणून दोनदा विजय मिळविला. मतदारसंघ पुनर्रचनेत श्रीरामपूर मतदारसंघ आज आरक्षित झाला असला तरी येथे ससाणे यांच्याच लोकप्रियतेमुळे काँगे्रसने ही जागा दोनदा राखल्याचे सर्वमान्य आहे.

साखरेच्या जागतिक बाजारपेठेबरोबरच बलाढ्य राजकीय धुरिणांच्या दैदिप्यमान यशाने प्रकाशमान झालेला श्रीरामपूर तालुका सहकाराची मातृभूमी म्हणून परिचित आहे. अशा पुढारलेल्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी होण्याची संकल्पना साकारणारे जयंत ससाणे हे असामान्य व्यक्तिमत्त्व होते, हेच खरे! त्यांच्या या यशामध्ये विकासकामांचा अभ्यास व पाठपुराव्याची सर्वमान्य सुलभ पद्धत असली, तरी त्यांचा सर्व सामान्यांमध्ये असलेला सहजतेचा वावर त्यांच्या लोकप्रियतेचा मुख्य गाभा होता. त्यामुळेच आज ‘सोशल इंजिनिअरिंग’चा मिळालेला चेहरा ससाणे यांच्या समाजकार्यातील प्रवेशाबरोबर अंर्तःमनावर कोरलेला होता हे वारंवार सिद्ध झालेले आहे.  

दि. 5 जुलै 1958 रोजी श्रीरामपूर तालुक्यातील ममदापूर येथे एका सुसंस्कृत शेतकरी कुटुंबात जयंतराव ससाणे यांचा जन्म झाला. ग्रामीण भागामध्ये शिक्षणाच्या अपुर्‍या सुविधांमुळे वडिलांनी शिक्षणासाठी श्रीरामपुरसारख्या शहरामध्ये त्यांची व्यवस्था केली, हीच त्यांची अन् श्रीरामपुरची पहिली ओळख! कोणताही राजकीय वारसा नसताना जनतेची छोटी-मोठी कामे करून त्यातून पुढे आलेला कार्यकर्ता हे ससाणे यांचे खरे भांडवल. वयाच्या विसाव्या वर्षी युवक मंडळ व यूथ पॉवर ऑर्गनायझेशनचे संस्थापक  अध्यक्ष असलेले ससाणे यांनी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करून तुरूंगवास भोगला होता.

वडिलोपार्जित शेती व्यवसायाची जवळून जाण असल्याने शेतीव्यवसाय विषयक शिबिरे हा त्यांचा आवडता छंद! याच कामातून ‘माणूस’ ही एकच जात व ‘माणूसकी’ हा एकच धर्म असल्याची शिकवण त्यांच्या हृदयात खोल घर करून बसली ती अगदी धु्रवतार्‍यासारखी. त्यामुळे श्रीरामपुरात गणेशोत्सव, शिवजयंती, रामजन्मोत्सव असो की, व्यायामशाळा उभारणी अथवा विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन. नेहमी जनमाणसांच्या सहवासात रममाण होणारे ससाणे यांची सिनेटवर झालेल निवड असो की, महाराष्ट्र प्रदेश  युवक  काँगे्रसचे सरचिटणीस अथवा  पक्षनिरीक्षक म्हणून  झालेली निवड, ही त्यांच्या सामाजिक कार्याची प्रेरणास्थळे ठरली. अन् यातूनच त्यांनी आपल्यातील जनसामान्यातून झटणार्‍या कार्यकुशल नेतृत्वाची झलक दाखवून दिली होती.  

सन 1985 मध्ये श्रीरामपूर नगपरिषदेचे नगरसेवक म्हणून सक्रिय राजकारणात पहिले पाऊल ठेवून यश मिळविणारे ससाणे 1987 ते 1997 पर्यंत नगराध्यक्ष झाले. विश्‍वासू मित्र हेच राजकारणातील खरी शक्तिस्थळे असल्याचे त्यांना उमगल्यामुळे सुरवातीपासूनच त्यांनी कोणतीही छोटी संघटना असो अथवा मोठी संस्था, आपल्या सर्व सहकार्‍यांसाठी समान न्यायाचा सिद्धांत आखला. हाच सिद्धांत कमालीचा यशस्वी ठरला. श्रीरामपूर नगरपरिषद हा  जयंतराव ससाणे यांच्या राजकारणाचा मुख्य पाया! आपल्या  वाणिज्य शाखेच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाबरोबर मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेवर प्रभूत्त्व मिळविणारे ससाणे यांनी नगरपरिषद प्रशासन व नागरी विकासकामांचा बारकाईने अभ्यास केला.

त्यातूनच शहरातील प्रत्येक भागात  विस्तारणार्‍या लोकवस्ती बरोबर त्यांच्या न्यायहक्कांसाठी आवश्यक उपाय शोधणारे ससाणे शहर  कासकामांतील गाढे अभ्यासक बनले. राज्यात शहरविकासाबाबत राबविल्या जाणार्‍या विविध योजना, बारामती, लातूरबरोबर श्रीरामपुरात आल्या. यातूनच त्यांच्या नावापुढे ‘विकास यात्री’ म्हणून लागलेली पदवी लोकमान्य ठरली. कोणतीही विकासयोजना सोप्या पद्धतीने राबविण्यासाठी राज्यभरातील मातब्बर जयंतरावांचा  सल्ला  घेत होते. हे त्यांचे राज्यातील राजकारणाचे पहिले पाऊल ठरले. 

भविष्यातील 25 वर्षांचा विचार करून श्रीरामपुरातील झोपडीमुक्त शहर योजना असो की, दोन वेळेला शुद्ध पाणीपुरवठा करणारी पाणीयोजना, अंडरग्राऊंड गटार योजना असो की, इतरांपेक्षा वेगळे आणि समाजाला पिढ्यानपिढ्या उपयोगात येणारे कामे करण्यात ससाणे यांचा हातखंडा होता. म्हणूनच सन 1999 व 2004 अशा दोन वेळा श्रीरामपूर विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून त्यांना निवडून देताना जनतेने विकासाचे मोठे स्वप्न बघितले. विकासकामात माहिर असलेले ससाणे यांनीही जनतेला भरभरून देण्यासाठी आपली संपूर्ण राजकीय शक्ती पणाला लावली ही घटना आजही इतिहासास नोंद घ्यायला लावणारी आहे.