Fri, Jul 19, 2019 20:05होमपेज › Ahamadnagar › एक लाख रुपये अन घर सोडण्याची सजा

एक लाख रुपये अन घर सोडण्याची सजा

Published On: Mar 10 2018 11:03AM | Last Updated: Mar 10 2018 11:02AMसंगमनेर : प्रतिनिधी

विवाहित मुलगी फूस लावून पळवून नेल्याच्या संशयावरून एका कुटुंबाला जातपंचायतीच्या आदेशाने बेदम मारहाण करून एक लाख रुपये भरपाई मागण्यात आली. मात्र, ती न देऊ शकल्याने या  कुटुंबाला राहत्या घरातून महिला, मुलांसह चक्क हाकलून देण्याचा संतापजनक प्रकार संगमनेरात घडला. संगमनेर शहर पोलिस ठाण्याच्या अगदी पाठीशी असलेल्या वडार समाजाच्या वसाहतीत हा  संतापजनक प्रकार घडला आहे. या वसाहतीत राहणारी एक विवाहित मुलगी बेपत्ता होती. तिच्या कुटुंबियांनी बाजूलाच राहणार्‍या तरुणावर तिला पळवून नेल्याचा संशय घेत जातपंचायतीकडे गार्‍हाणे  मांडले.

कोणताही कायदेशीर आधार नसलेली घटनाबाह्य जातपंचायतही लागलीच बसली. ज्या तरुणावर मुलगी पळविल्याचा संशय आहे, त्याला पंचांसमोर हजर करण्याचे फर्मान सुटले. मात्र, दुदैवाने त्यावेळी हा तरुण याबाबत अनभिज्ञ होता व घरीही नव्हता. त्यामुळे पंचांसह उपस्थित सर्वांनाच वाटले मुलगी यानेच पळविली. संशयित तरुण हजर नसल्याने संबंधित तरुणाच्या अख्ख्या  कुटुंबाला पंचांसमक्ष उभे करण्यात आले. त्याच्या कुटुंबीयांनी असा प्रकार घडला नसल्याचे वारंवार पंचांना सांगितले. मात्र, त्यावर कोणीही विश्‍वास ठेवायला तयार होईना. अखेर पंचांनी त्याच  दिवशी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुलगी हजर करा व नुकसान भरपाई म्हणून एक लाख रुपये द्या, असा निर्णय दिला.

परंतु या दोन्ही गोष्टी घडून आल्या नाही. त्यातच सायंकाळी 5 वाजता पुन्हा पंचायत बसली. मुलगीही नाही आणि पैसेही नाही म्हटल्यावर पंचांनी सदर कुटुंबाची वसाहतीतून हकालपट्टी करण्याचे नवे  फर्मान काढले.  पंचांच्या आदेशानुसार लागलीच कारवाई करण्यात आली. संबंधित कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या घरातून अक्षरशः खेचून बाहेर काढण्यात आले. मुलीकडील मंडळींनी त्यांना  बेदम  मारहाण केली. त्यांच्या राहत्या घराला ‘टाळे’ ठोकण्यात आले. आणि त्यांना अपमानित करून वसाहतीतून हुसकावून लावण्यात आले. एका क्षणात घर गमावलेले हे कुटुंब न्यायाच्या आशेने अंधश्रद्धा निर्मूलनाच्या जिल्हाध्यक्षा अ‍ॅड. रंजना गवांदे यांच्याकडे मदतीसाठी पोहोचले. पण रात्री उशीर झाल्याने त्यांनी या कुटुंबाच्या राहण्याची व्यवस्था केली.

दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांनी पोलिस  ठाणे गाठून घडला प्रकार पोलिसांच्या कानी  घातला. पोलिसांनीही डायरीला नोंद घेत पंचांसह त्या मुलीच्या नातेवाईकांना ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले. काही क्षणातच पोलिस ठाण्याच्या  आवारात गर्दी दाटली. पोलिसांनी भारतीय घटना,  जातपंचायती आणि कायदा या गोष्टी समजावून सांगितल्यानंतर जातपंचांनी आपले फर्मान मागे घेतले.  प्रबोधन व कायद्याची माहिती गरजेची शिक्षणाचा टक्का कमी असलेल्या समाजात आजही अंधश्रद्धा, रुढी आणि परंपरा जपल्या जातात. हा प्रकारही अशाच समाजातला आहे. पोलिसांच्या सहकार्याने हे प्रकरण मिटले असले तरी अशा  कारातून सामाजिक विषमतेचे पदोपदी दर्शन घडते. संबंधित कुटुंबियांना पुढील जीवन जगतांना अडचणी येऊ नये, यासाठी या प्रकरणात तडजोड करण्यात आली आहे. प्रबोधन आणि कायद्याची  माहिती देऊनच असे प्रकार थांबविणे शक्य आहे. - अ‍ॅड.रंजना गवांदे, सामाजिक कार्यकर्त्या