Wed, Jul 17, 2019 10:14होमपेज › Ahamadnagar › ये कहाँ आ गये हम...!

ये कहाँ आ गये हम...!

Published On: Jan 08 2018 1:12AM | Last Updated: Jan 07 2018 10:52PM

बुकमार्क करा
.  जामखेड : मिठूलाल नवलाखा

जामखेड नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 नगरसेवकांनी बंडखोरी करत भाजपाशी घरोबा केल्यामुळे राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी त्या 9 नगरसेवकांविरोधात पक्षशिस्त भंगाची कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे तातडीने प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना तालुका राष्ट्रवादीला दिल्या आहेत. ज्या उद्देशासाठी राष्ट्रवादीचे ते  नगरसेवक भाजपबरोबर गेले होते तो उद्देश सफल न होता राजकीय कुरघोड्यांच्या गर्तेत ते नगरसेवक पूर्णतः अडकल्याचे आता स्पष्ट होत आहे. त्यामुळे त्या नगरसेवकांची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी झाली आहे.  राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाने उशिरा घेतलेल्या भूमिकेमुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे  आता राजकीय फडावर भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना पाहावयास मिळणार आहे. 

जामखेड नगर परिषदेची स्थापना झाल्यानंतर प्रथम नराध्यक्षपदाचा मान प्रिती विकास राळेभात या राष्ट्रवादीच्या सहयोगी नगरसेविकेला मिळाला होता. यासाठी राष्ट्रवादीचे 10, शिवसेनेचे 4 व अपक्ष 2  अशा 16 नगरसेवकांनी एकत्रित येत सत्ता स्थापन केली होती. या निवडणुकीत जामखेडच्या जनतेने  सत्ताधारी भाजपाला पूर्णतः नाकारत फक्त 3  जागांवर कौल दिला होता. देशभर सत्ता मिळवत भाजपचा उधळलेला वारू जामखेडच्या जनतेने रोखून धरत पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना त्यांच्या होम ग्राऊंडवर धोबीपछाड दिला होता. 

जामखेडकरांनी विरोधात कौल दिल्याने पालकमंत्री राम शिंदे कमालीचे नाराज झाले होते. या नाराजीतून शिंदे यांनी जामखेड नगरपरिषदेला येणारा निधी अडवून धरत नगरपरिषदेच्या कारभार्‍यांची मुस्कटदाबी करण्याबरोबरच शहरवासियांना वेठीस धरण्याचा कुटील राजकीय डाव  खेळला. यातून मग नगरपरिषदेला येणार कोणताही निधी थेट बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याचे यशस्वी मनसुबे सत्ताधारी भाजपकडून खेळले गेले. याच राजकीय डावपेचातून नगरपरिषदेला आलेल्या आठ कोटींचा निधी बांधकाम विभागाकडे वर्ग केल्याने मोठा वाद झाला. हा वाद औरंगाबाद खंडपीठात गेला. त्यामुळे जामखेड शहर विकासापासून वंचित राहिले. राज्यात सत्ताधारी असलेल्या मंत्र्यांच्या तालुक्यातील महत्वाचे शहर राजकीय वादामुळे विकासापासून वंचित राहिल्याने सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जामखेडच्या जनतेमध्ये संतापाचे वातावरण होते.

याच संतापाचा थेट परिणाम राष्ट्रवादीलाही भोगावा लागला. मात्र वर्षभरात हायकोर्टाकडून कुठलाच निर्णय लागत नसल्याने त्याबरोबर जनतेची वाढत चाललेली नाराजी यामुळे राष्ट्रवादीचे 9, शिवसेनेचे  2 व अपक्ष 1 अशा 12 जणांनी बंडखोरी करत भाजपशी व पालकमंत्री राम शिंदे यांच्याशी घरोबा  केल्यामुळे विरोधात असलेल्या भाजपाला नगरपरिषदेत सत्ता स्थापन करण्याची आयती संधी चालून आली. राजकीय डावपेचात सत्ताधारी राष्ट्रवादीवर कढी करत निर्माण केलेल्या संधीचे सोने प्रा. राम  शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने केले व नगरपरिषदेवर आपली सत्ता स्थापन करण्यात यश आले. मात्र, हायकोर्टात निधी संदर्भात दाखल केलेल्या याचिकेचा निकाल राष्ट्रवादीचा बाजूने लागला असला तरी याचा थेट फायदा भाजपाला झाला. 

जामखेड राष्ट्रवादीच्या मात्तबर नेत्यांनी नगरपरिषदेच्या कारभारात अभ्यासपूर्ण संवाद ठेवला असता तर राष्ट्रवादीला सत्ता गमवावी लागली नसती, मात्र राष्ट्रवादीकडून  नगरसेवकांना बळ न मिळाल्याने भाजपने धूर्त राजकारण खेळत राष्ट्रवादीला कात्रजचा घाट दाखवला. यामुळे राष्ट्रवादीला आता आत्मचिंतन करून नव्याने शहराच्या समस्यांवर उघड भूमिका घेत नागरिकांच्या पाठीशी उभे राहावे लागेल अन्यथा आगामी काळात याची जबर किंमत राष्ट्रवादीला भोगावी लागणार असेच चित्र दिसत आहे.यासाठी शहराला आलेला विकासनिधी योग्य मार्गाने वापर होतो की नाही यावर लक्ष ठेवून जागल्याची भूमिका पार पाडावी लागणार आहे . 

नगरपरिषदेवर भाजपने सत्ता मिळवताना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना जे शब्द दिले होते ते फिरवत नव्या राजकीय समीकरणांना जन्म घातला. यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी अवस्था राष्ट्रवादीच्या त्या 9 नगरसेवकांची झाली होती. दरम्यान, भाजपशी घरोबा करून 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला तरी निधी नगरसेवकांच्या पदरात काहीच पडले नव्हते मात्र पालकमंत्री  राम  शिंदे यांनी  ‘थर्टी फर्स्ट’  चा मुहूर्त साधत 3 कोटी  रुपयांचा निधी उपलब्ध करून देत विविध विकास कामांचे भूमिपूजनाचा मुहूर्त साधला. मात्र 3 कोटीच्या निधी वाटपात भाजपच्या नगरसेवकांना झुकते माप देत जादा निधी दिला. ज्यांच्या  पाठबळावर भाजपाला सत्तेचा सोपान गाठता आला त्या राष्ट्रवादीसह अन्य नगरसेवकांना कमी निधी देऊन सापत्नपणाची वागणूक दिली जात आहे. ालकमंत्री राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात तसेच  मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यादरम्यान भाजपाला पाठिंबा दिलेल्या राष्ट्रवादीच्या, शिवसेनेच्या व अपक्ष  नगरसेवकांना सन्मानाची वागणूक मिळाली नाही.ही बाब ते नगरसेवक जाहीरपणे बोलून दाखवत आहेत. 

दरम्यान, नगरपरिषदेला 3 कोटींचा निधी पालकमंत्री राम शिंदे यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल नगरपरिषदेने पालकमंत्री राम शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पालकमंत्र्यांना खुश करण्यासाठी लाखो रुपये खर्चून पूर्ण शहर फ्लेक्समय केले होते. त्याचबरोबर संगीत रजनीच्या कार्यक्रमांचेही आयोजन केले होते . संगीत रजनी व डिजिटल फ्लेक्स याचा खर्च लाखोंच्या घरात गेल्याचे बोलले जात आहे. हा सर्व खर्च प्रत्येक नगरसेवकांकडून वसूल केला जाणार असल्याचे नगरसेवकांनी ठरवले होते मात्र 1 जानेवारीला झालेल्या विविध कार्यक्रमात सन्मानजनक वागणूक भाजपने न दिल्याने हे सर्व नगरसेवक नाराज झाले आहेत. नाराज नगरसेवकांनी तो खर्च आता आम्ही देणार नाही अशी भूमिका घेतली आहे . सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार तो खर्च साधारणतः 8 ते 10 लाख झाल्याचे समजते. नेमका हा खर्च कोण देणार ? नगरपरिषद की अन्य  याबाबत शंका आहे .