Mon, Jun 17, 2019 02:53होमपेज › Ahamadnagar › खरेदी केंद्र तीन दिवसांपासून बंद

खरेदी केंद्र तीन दिवसांपासून बंद

Published On: Dec 08 2017 1:35AM | Last Updated: Dec 07 2017 11:22PM

बुकमार्क करा

जामखेड : प्रतिनिधी 

जामखेड येथील उडीद, सोयाबीन खरेदी केंद्र 12 डिसेंबर पासून बंद होणार असल्याच्या अफवेने तालुक्यातील शेतकर्‍यांच्या केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. चारशेच्या आसपास वाहने रांगेत असून, अधूनमधून येणारा पाऊस व दररोजचे वाहनभाडे, त्यामुळे माल कधी घेतला जाईल, या आशेवर शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. 

उडीद व सोयाबीन खरेदी केंद्र बंद पडणार असल्याच्या अफवेने उडीद घालण्यासाठी तालुक्यातील शेतकरी माल घेऊन केंद्रावर येत आहेत. येथील प्रशासनाने दररोज होणार्‍या खरेदीपेक्षा जास्त शेतकर्‍यांना एसएमएस पाठविल्याने अनेक शेतकरी दहा ते बारा दिवसांपासून केंद्राबाहेर रांगेत थांबले आहेत. त्यामुळे खरेदी केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहनमालकांना लागणारे दररोजचे हजार ते बाराशे रुपयांचे भाडे शेतकर्‍यांच्या माथी पडत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

ज्ञानेश्‍वर झेंडे - अध्यक्ष पुण्यश्‍लोक उडीद खरेदी केंद्र - 

उडीद खरेदी केंद्र बंद पडणार असल्याच्या अफवा अज्ञात लोकांनी पसरवली आहे. त्यामुळे शेतकरी उडीद घेऊन येत आहे. जेवढ्या लोकांनी नाव नोंदणी केली, त्यांचा माल घेतला जाणार आहे. खरेदी केंद्र फेब्रुवारी अखेर चालू राहणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी अफवेकडे दुर्लक्ष करावे. पैठण येथील गोदामात माल साठवण्याची परवानगी मिळाली असून, लवकरच खरेदी केंद्र सुरू होईल, अशी माहिती पुण्यश्‍लोक उडीद खरेदी केंद्राचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर झेंडे यांनी दिली.  

उडदाची नोंदणी केल्यानंतर 29 नोव्हेंबर रोजी मेसेज आला. त्यामुळे उडीद आणला. परंतु आजअखेर नंबर आला नाही. त्यामुळे ट्रॅक्टरसाठी दररोज हजार रुपये भेडे देत आहे. तसेच शेतीची कामे सोडून येथे थांबावे लागत आहे. त्याचाही आर्थिक भुर्दंड बसत असल्याचे शेतकरी सुनील पारे यांनी सांगितले.

दहा दिवसांपासून केंद्राबाहेर रांगेत आहे. मागील वेळी तूर पीक घेतले होते. त्यावेळी महिनाभराने नंबर लागला होता. खरेदी केंद्र चार दिवसाला बंद पडते. तसेच अधूनमधून पडणार्‍या पावसामुळे व वाहनाच्या भाड्यामुळे आर्थिक अडचणीत आलो आहे. त्यामुळे यापुढे कोणते पीक घ्यावे, हा प्रश्‍न पडला असल्याचे होसराव पवळ यांनी सांगितले.