होमपेज › Ahamadnagar › जामखेड हत्याकांड : आरोपींना ७ दिवस पोलिस कोठडी

जामखेड हत्याकांड : आरोपींना ७ दिवस पोलिस कोठडी

Published On: May 03 2018 1:27AM | Last Updated: May 02 2018 11:54PMजामखेडः प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश राळेभात यांच्या हत्येप्रकरणात  जामखेडचे माजी सरंपच कैलास माने, प्रकाश माने व इतर तीन जणांना अटक करण्यात आली. त्यांना मंगळवारी (दि.1)  न्यायालयात हजर केले असता, सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. 

जामखेड येथील योगेश राळेभात व राकेश राळेभात यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. याप्रकरणी 29 एप्रिल रोजी खुनाचा  गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात मुख्य आरोपी गोविंद दत्ता गायकवाड यांच्यासह इतर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर 30 एप्रिल रोजी फिर्यादी कृष्णा अंबादास राळेभात यांनी दिलेल्या पुरवणी जबाबामध्ये म्हटले आहे की, माझा भाऊ योगेश व राकेश या दोघांचा शिवशंकर तालमीचा वस्ताद उल्हास विलास माने (वय 40), बाजार समितीचे संचालक व भाजप प्रणित भटक्या विमुक्तचे अध्यक्ष  काकासाहेब गर्जे (वय 35), जामखेडचे माजी सरपंच कैलास माने (वय 46), प्रकाश माने (वय 44), अक्षय मोरे, एक अनोळखी मोटारसायकल चालक यांनी मिळून कट करून खून केल्याचे पुरवणी जबाबात म्हटले आहे. 

या गुन्ह्यात माजी सरंपच कैलास माने, प्रकाश माने (दोघे रा. जामखेड), दत्ता गायकवाड (रा. तेलगंशी, ता. जामखेड), सचिन गोरख जाधव (रा. भांडेवाडी, ता. कर्जत), बापू रामचंद्र काळे (रा. नेर्ले, ता. करमाळा) या पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, 1 मे रोजी जामखेड येथील न्या.ए. एम. मुजावर यांच्या समोर पोलिसांनी हजर केले असता, पोलिसांनी आरोपींच्या तपासासाठी 7 दिवसांची पोलिस कोठडी मागीतली. गुन्ह्याचे स्वरूप पाहता न्यायालयाने 7 दिवसांची पोलिस कोठडी दिली.

तालमीतून एक तलवार, दोन कोयते जप्त

या हत्याकांड प्रकरणाचा तपास करणार्‍या पोलिसांनी शिवशंकर तालमीत टाकलेल्या छाप्यात एक तलवार व दोन कोयते जप्त केले. त्यानुसार जामखेड पोलिसात शिवशंकर तालमीचा प्रमुख उल्हास माने व इतर एक जणांविरोधात शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.