Sun, Feb 23, 2020 09:21होमपेज › Ahamadnagar › आरोपींच्या अटकेसाठी गाव एकवटले

आरोपींच्या अटकेसाठी गाव एकवटले

Published On: May 01 2018 1:14AM | Last Updated: May 01 2018 1:09AMजामखेड : प्रतिनिधी

योगेश राळेभात व राकेश राळेभात यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना तातडीने अटक करून मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात यावी, तसेच शहरातील अवैध धंदे बंद करण्यात यावेत, असे ठराव सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आले.

योगेश राळेभात व राकेश राळेभात यांची दिवसा ढवळ्या बीड रस्त्यावर हत्या करण्यात आली. त्यामुळे शहर हादरून गेले आहे. या घटनेच्या निषेधार्थ जामखेड येथे काल (दि.30) सर्वपक्षीय सभा घेण्यात आली. यावेळी पोलिस उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे, पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार, तहसीलदार विजय भंडारी, मोहळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक राजेंद्र कोठारी, ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय वारे, डॉ. भास्करराव मोरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे, भाजपाचे तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, शिवसेना तालुकाप्रमुख शहाजी राजेभोसले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुधीर राळेभात, पंचायत समिती सभापती सुभाष आव्हाड आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी सभेत आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, त्याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात यावी, आरोपींना साथ देणार्‍या माने कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, ज्या तालमीत गुन्हेगार तयार केले जातात, ती तालीम पाडण्यात यावी व त्या जागेवर स्मशानभूमी बांधण्यात यावी, ज्या फलकावरून वाद निर्माण झाला, तेथे वर्षभर फलक लावू नयेत, शहरातील अवैध धंदे बंद करण्यात यावेत, चोरीच्या मोटारसायकलींबाबत कारवाई करावी, रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्यात यावा, आदी मागण्या करण्यात आल्या.

गावठी कट्टे बाळगणार्‍यांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात यावेत, असा ठराव घेण्यात आला. हे ठराव जि. प.चे माजी सदस्य मधुकर राळेभात यांनी वाचून दाखविले. पोलिस उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे म्हणाले, आरोपींना शोधण्यासाठी दहा पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांची शोध मोहीम सुरू आहे. या प्रकरणात कुणालाही सोडले जाणार नाही. जामखेडवर जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी स्वत लक्ष घातले आहे. त्यामुळे आपण काळजी करू नका. आरोपींवर लवकरच कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.पोलिस निरीक्षक पवार म्हणाले, जो कोणी आरोपींची माहिती देईल, तसेच पिस्तूल व अवैध धंद्यांची माहिती देईल , त्याचे नाव गुप्त ठेवून बक्षीस दिले जाईल.