Sun, Nov 18, 2018 21:52होमपेज › Ahamadnagar › ..अन् पालकमंत्री मागच्या दाराने बाहेर

..अन् पालकमंत्री मागच्या दाराने बाहेर

Published On: Apr 29 2018 11:53PM | Last Updated: Apr 29 2018 11:42PMनगर : प्रतिनिधी

जामखेडमधील दोघांची हत्या झाल्यानंतर त्यांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. पालकमंत्री प्रा. राम शिंदे हेही त्यांच्या ताफ्यासह जिल्हा रुग्णालयात पोहोचले. परंतु, त्यांच्या निषेधाच्या घोषणा व नागरिकांचा रोष पाहून पोलिसांनी त्यांना पाठीमागील बाजूच्या दरवाजाने ‘सिव्हिल’मधून बाहेर काढले. तारकपूर रस्त्याच्या बाजूने नेऊन तेथून खासगी वाहनातून शासकीय विश्रामगृहावर सुखरुप पोहोचविले.
गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या योगेश राळेभात व राकेश राळेभात यांना उपचारासाठी जामखेड येथून नगरच्या खासगी रुग्णालयात आणण्यात आले. परंतु, उपचार सुरू असताना डॉक्टरांनी दोघांनाही मयत घोषित केले. त्यामुळे मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तेथून प्राथमिक कार्यवाही पूर्ण करून मृतदेह पुण्यातील ससूनला हलविले जाणार होते.

दोघांचे मृतदेह आणल्यानंतर जिल्हा रुग्णालयात मयतांचे नातेवाईक व जामखेडमधील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकांची मोठी गर्दी झाली. मयत मतदारसंघातील असल्याने पालकमंत्री प्रा. राम शिंदे हेही त्यांच्या ताफ्यासह जिल्हा रुग्णालयात पोहोचले. ते मयतांचे नातेवाईक व पोलिस अधिकार्‍यांशी चर्चा करीत होते. त्याचवेळी जमावातील काही जण आक्रमक झाले. त्यांनी पालकमंत्री शिंदे यांच्या निषेधाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. तसेच नागरिकांच्या रोषालाही सामोरे जावे लागले. जमाव पालकमंत्र्यांविरुद्ध आक्रमक होऊ लागला. त्यामुळे पुन्हा जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या त्यांच्या ताफ्यातील वाहनातून परत जाणे कठीण झाले. वातावरण चिघळू नये, म्हणून पोलिसांनी शक्कल लढविली. पालकमंत्री शिंदे यांना जिल्हा रुग्णालयातील पाठीमागील बाजूने बाहेर काढले. तेथून तारकपूर रस्त्यावर नेले. तेथे एका खासगी वाहनातून बसविले. त्या वाहनातून पालकमंत्री शिंदे यांना सुखरुप शासकीय विश्रामगृहावर पोहोचविले. शिंदे विश्रामगृहावर पोहोचल्यानंतर ताफ्यातील वाहने व सुरक्षारक्षक हळूहळू जिल्हा रुग्णालयातून बाहेर पडले.