Sat, Jun 06, 2020 07:45होमपेज › Ahamadnagar › वंजारवाडीचा भरलेला बंधारा झाला अर्धा

वंजारवाडीचा भरलेला बंधारा झाला अर्धा

Published On: Dec 12 2017 2:03AM | Last Updated: Dec 11 2017 11:05PM

बुकमार्क करा

जामखेड ः प्रतिनिधी 

तालुक्यातील वंजारवाडी येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधारा पूर्ण क्षमतेने भरलेला होता. अतिदाबामुळे या बंधार्‍यातील एका मोरीतील दोन लोखंडी दरवाजे रात्रीच्या सुमारास वाहून गेले. यात बंधार्‍यातील निम्मे पाणी वाहून गेले. या बंधार्‍याचे दरवाजे वीस फूट अंतरावर सापडले आहेत.

 घटनेबाबत वंजारवाडी ग्रामस्थांनी जलसंपदा खात्याच्या अधिकार्‍यांना दूरध्वनीवरून माहीती दिली पण ते हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर येथे गेल्याचे सांगण्यात आले. 30 दशलक्ष घनफूट क्षमतेचा असलेला हा बंधारा वंजारवाडी व दोन कि.मी. परिसरातील शेतकर्‍यांसाठी वरदान ठरलेला आहे. यामुळे हजार एकर क्षेत्राला या बंधार्‍यातील पाण्यामुळे  बारामहिने पिके घेता येतात.

 अधिकारी लक्ष देत नसल्याने शाहूराव जायभाय, रामकिशन जायभाय, महेशकुमार गर्जे, कुंडलिक गर्जे आदी वीस जणांनी सायंकाळ पर्यंत प्रयत्न केले. परंतु यश आले नाही. जवळपास 20 दशलक्ष घनफूट पाणी वाहून गेले. त्यामुळे   शेतकर्‍यांत हळहळ व्यक्त होत आहे. यंदा जोरदार पाऊस झाल्याने बंधारा पूर्ण क्षमतेने भरला होता. मात्र, पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडली. पाणी वाहून गेल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाईसह शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण होणार आहे.