Fri, Mar 22, 2019 07:48होमपेज › Ahamadnagar › नऊ वर्षांच्या बालिकेवर मेव्हुण्याकडून अत्याचार

नऊ वर्षांच्या बालिकेवर मेव्हुण्याकडून अत्याचार

Published On: Dec 17 2017 1:31AM | Last Updated: Dec 16 2017 11:53PM

बुकमार्क करा

जामखेड प्रतिनिधी

नऊ वर्षांच्या मुलीवर तिच्या बहिणीच्या नवर्‍यानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या बहिणीने आपल्या पतीविरोधात जामखेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.  या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामखेड तालुक्यातील पाटोदा येथील आदिवासी कुटूंब ऊसतोडणीसाठी करमाळा तालुक्यातील चिकलठाण येथे गेलेले आहे. फिर्यादीची नऊ वर्षे वयाची लहान बहीणही या कुटुंबाबरोबर होती. ते ऊसतोडीच्या कामाच्या ठिकाणी एका कोपीत राहत होते. 

13 डिसेंबर रोजी फिर्यादी आपल्या आजारी असलेल्या लहान मुलीला जामखेड येथे दवाखान्यात घेऊन आली होती. त्यावेळी ती आपल्या लहान बहिणीला नवर्‍याजवळच कोपीवरच ठेवून आली होती. याच संधीचा फायदा उचलत आरोपीने कोपीतच आपल्या नऊ वर्षांच्या मेव्हुणीवर तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केला. तसेच तिचा गळा दाबत याची वाच्यता केल्यास जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. संध्याकाळी मोठी बहीण घरी आल्यावर पीडितेनेे घडलेली घटना तिला सांगितली. त्यामुळे संतापलेल्या मोठ्या बहिणीने करमाळा येथून झिरो नंबरने जामखेड येथे पोलिस उपअधीक्षक सोनाली कदम यांना घडलेली घटना सांगितली. सोनाली कदम यांच्या सूचनेनुसार जामखेड पोलिस ठाण्यातील काँन्स्टेबल चव्हाण यांनी याप्रकरणी आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून घेतला. ही घटना करमाळा तालुक्यातील असल्याने जामखेड पोलिसांनी पुढील तपासासाठी करमाळा पोलिस ठाण्यात हा गुन्हा वर्ग केला आहे.