Thu, Mar 21, 2019 15:26होमपेज › Ahamadnagar › खंडणीप्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा

खंडणीप्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा

Published On: Dec 14 2017 1:43AM | Last Updated: Dec 14 2017 12:58AM

बुकमार्क करा

जामखेड : प्रतिनिधी

येथील आडत व्यापारी राहुल बेदमुथ्था यांना संभाजी बिगे्रडचे नाशिक विभागीय अध्यक्ष अण्णासाहेब सावंत व माजी मराठवाडा विभागीय अध्यक्ष  शशिकांत कन्हेरे यांनी पाच लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी जामखेड खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.  फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 10 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता आमचे दुकानी राजाराम साधू हुलंगुडे आले. त्यांनी मला सांगितले की, मला उडदाचे सॅम्पल घेऊन अण्णासाहेब सावंत यांनी पाठविले आहे. आम्ही त्यांचे सॅम्पल पाहून ते खराब व चूर असल्याने त्याला हमीभावाप्रमाणे भाव मिळणार नाही, 2800 ते 3000 रूपयांपर्यंत विक्री होऊ शकते, असे सांगितले.

त्यानंतर अण्णासाहेब सांवत यांनी आमच्या दुकानी उडीद आणून टाकला. दुपारी त्याचा लिलाव झाला. लिलावात सदरचा उडीद खराब असल्याने त्याची नोंद कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड यांच्या कर्मचार्‍यांनी लिलाव रजिस्टरमध्ये तशी नोंद घेतली. तो माल आम्ही 2951 रूपये प्रमाणे लिलावात घेतला. त्या भावाप्रमाणे आम्ही संपूर्ण 20 हजार 59 रूपये दिले. ते पैसे घेऊन निघून गेले. त्यानंतर त्यांनी माझ्या विरोधात जामखेड बाजार समितीत उडीद हमी भावापेक्षा कमी दरात घेतला म्हणून अर्ज दिला. त्याबाबत बाजार समितीकडून नोटिस आल्यानंतर मला माहिती मिळाली. 
नंतर अण्णासाहेब सावंत यांनी पिंटू उर्फ रसिकलाल बोथरा यांच्या मोबाईलवर राहुल बेदमुथ्था यांच्या विरोधात मी बाजार समितीत तक्रार केली आहे, ती मागे घ्यायची असेल व आडत सुरळीत चालवायची, लायसन्स टिकवायचे असेल, तर शशिकांत कन्हेरे (रा. आष्टा, ता. आष्टी, जि. बीड) त्यांच्या जवळ पाच लाख रूपये देऊन टाका, असे सांगितले.

त्यानंतर शशिकांत कन्हेेरे यांनी माझ्या दुकानी येवून अण्णसाहेब सावंत यांनी तुमच्याकडून पैसे घेण्यास सांगितले आहे, तूम्ही पैसे द्या, अशी खंडणी मागितली. त्यावर काही उत्तर न दिल्याने संध्याकाळी पुन्हा पिंटू बोथरा यांना अण्णसाहेब सावंत समक्ष भेटले व समज दिली. असे दोन ते तीन वेळा घडले. त्यामुळे अण्णासाहेब उर्फ श्रीकृष्ण आदिनाथ सावंत व शशिकांत आश्रू कन्हेेरे यांच्या विरोधात फिर्याद देत असल्याचे फिर्यादी बेदमुथ्था यांनी म्हटले आहे. त्यावरुन पोलिसांनी भा.दं.वि. कलम 384, 385, 34 प्रमाणे खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. 

यावर जामखेड असोसिएशनचे अध्यक्ष रमेश जरे व व्यापार्‍यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अण्णासाहेब सावंत यांचे वैयक्तिक नावावर तालुक्यात कुठेही शेत जमीन नाही. उडीद देताना कुठलाही सात-बारा उतारा जोडलेला नाही. त्यामुळे ते बोगस शेतकरी आहे. सावंत हे तालुक्यातील गोर गरिब व्यापार्‍यांना संघटनेचा धाक दाखवून दहशत निर्माण करीत आहेत. त्यामुळेच त्यांनी व्यापारी राहुल बेदमुथ्था यांना पाच लाखांची खंडणी मागितली. त्याबाबत मोबाईल रेकॉडींग आहे. सावंत यांच्यावर कारवाई न झाल्यास सर्व व्यापारी बेमुदत आडत बंद ठेवतील, असा इशारा व्यापार्‍यांनी दिला.
यावर संभाजी बिग्रेडचे नाशिक विभागीय अध्यक्ष अण्णसाहेब सावंत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मी माझ्या शेतात पिकवलेला उडीद सुरेश अ‍ॅण्ड कंपनीचे मालक राहुल बेदमुथ्था यांच्या आडतीवर विकला. उडीदाला 5400 रूपये दर असताना व उडीद सर्वोत्तम प्रतिचा असताना बेदमुथ्था यांनी माझा उडीद कमी भावाने घेऊन माझी आर्थिक कुंचबना केली. त्यामुळे दि. 15 डिसेंबर रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालयसमोर आत्मदहन करण्याचा इशारा सावंत यांनी दिला आहे.