होमपेज › Ahamadnagar › बोंडअळीने केला कपाशीचा घात

बोंडअळीने केला कपाशीचा घात

Published On: Dec 11 2017 1:27AM | Last Updated: Dec 10 2017 10:42PM

बुकमार्क करा

जामखेड ः मिठूलाल नवलाखा

ऊस दर वाढीच्या विवंचनेत शेतकरी वर्ग असतानाच जामखेड तालुक्यातील कपाशीच्या नगदी पिकाचा गुलाबी बोंड अळीने घात केला आहे. तालुक्यात मागील काही वर्षांपासून नगदी पीक कपाशीचे उत्पादन घेण्याकडे शेतकर्‍यांचा कल वाढला. या वर्षी कृषि विभागाच्या आहवालानुसार तालुक्यात सुमारे 5 हजार हेक्टर क्षेत्र कपाशीच्या लागवडी खाली आहे. त्यापैकी सुमारे 90 टक्के क्षेत्र बाधित झाल्याचे चित्र आहे. बाधित क्षेत्राच्या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाच्या वतीने सुरु आहे. 

जामखेड तालुक्याचा परिसर पूर्वापार दुष्काळी परिसर म्हणून ओळखला जातो.खरीप व रब्बी हंगामातील शेतीच्या उत्पादनावरच येथील शेतकर्‍यांच्या संसाराची मदार असते. तालुक्यात रब्बी हंगामात गहू, हरभरा, ज्वारीबरोबर नगदी पीक म्हणून कपाशीची लागवड केली जाते. मागील काही वर्षापासून जामखेड  परिसरात पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणार्‍या कपाशीचे उत्पादन घेण्याकडे शेतकर्‍यांचा वाढता कल आढळून येतो आहे. शेवगाव, पाथर्डी, नेवासा या परिसरात पाठोपाठ कपाशीछे  विक्रमी उत्पादन घेतले जाऊ लागले. यंदा दमदार झालेल्या भरवशावर रब्बी हंगामाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. कृषी विभागाच्या अंदाजित अहवालानुसार जिल्ह्यात 1 लाख 25 हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली आहे. त्यात शेवगाव तालुक्यात 43 हजार 231 हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली असून, त्याखालोखाल पाथर्डी तालुक्यात 25 हजार 803, नेवासा तालुक्यात 21 हजार 187, राहुरीमध्ये 10 हजार 222, तर जामखेडमध्ये 5 हजार 530 आणि कर्जत तालुक्यात 8 हजार 282, श्रीरामपूर 3 हजार 457, कोपरगाव 3 हजार 106 हेक्टर क्षेत्रावर कपाशीचे उत्पन्न शेतकर्‍यांनी घेतले आहे. 

बोंड आळीचे संकट  कपाशी या नगदी पिकावर यंदा गुलाबी अर्थात बोंडअळीने घाला घातला आहे. या रोगाचा प्रादुर्भाव कपाशी फुलण्याच्या स्थितीत असताना होतो. फूल धारण्याच्या वेळेस घातलेल्या अंड्याचे रुपांतर अळीत होते आणि कापसाच्या बोंडावर ही अळी हल्ला करून त्यातला रस शोषते. याच अळीच्या प्रादुर्भावाने जामखेड तालुक्यात  कपाशीचे उभे फड उद्ध्वस्त केले आहे. 
पंचनाम्याचे काम सुरू  बोंड अळीमुळे जिल्ह्यातील कपाशीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर बाधित झाले आहे. बाधित झालेल्या प्लॉटचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. कृषी विभागातील मंडलाधिकारी कृषी साहाय्यकांना जी/एच फॉर्म भरून देण्यासाठी व पंचनामे करण्यासाठी शेतकर्‍यांनी सहकार्य करावे, तसेच सात-बारा उतारा आणि बियाणे खरेदीची पावती ही अधिकार्‍यांना द्यावी, एकूण नुकसानीचा अहवाल पंधरा दिवसात प्राप्त होईल, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर यांनी दिली.