Thu, Jun 27, 2019 11:41होमपेज › Ahamadnagar › जामखेडसाठी २५ कोटी देणार

जामखेडसाठी २५ कोटी देणार

Published On: Jan 02 2018 12:53AM | Last Updated: Jan 02 2018 12:03AM

बुकमार्क करा
जामखेड : प्रतिनिधी

जामखेड तालुक्याला कुकडीचे दोन टीएमसी पाणी, केंद्र सरकारचे भारत बटालियन सेंटर, जामखेड शहराच्या विकासासाठी 25 कोटी रुपये निधीची घोषणा करून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जामखेडकरांना नवीन वर्षाची मोठी भेट दिली. हळगावबरोबरच श्रीगोंद्यालाही कृषी महाविद्यालय होणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली  जामखेड तालुक्यातील हळगाव येथे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचा भूमिपूजन कार्यक्रम काल (दि.1) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे होते. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खा.दिलीप गांधी, आ. शिवाजी कर्डिले, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा, विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी अभय महाजन, जिल्हा पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा, भाजपा जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड आदींसह तालुक्यातील संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की जामखेडसारख्या दुष्काळी भागाला नववर्षाची भेट म्हणून कोरड्या शुभेच्छा न देता, हळगाव येथे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय भेट दिले आहे. या  महाविद्यालयासाठी पालकमंत्री राम शिंदे यांनी प्रश्‍न लावून धरला होता. त्यामुळे या महाविद्यालयास मूर्त स्वरूप मिळाले. या कृषी महाविद्यालय संदर्भात काही लोक (बबनराव पाचपुते यांचे नाव न घेता) न्यायालयात गेले. त्यावेळी आपण मध्यस्थी करीत या महाविद्यालयाच्या कामात अडथळा आणू नका. तुम्हालाही (श्रीगोंदेकरांना) परवानगी देऊ, असे सांगत श्रीगोंद्यातही कृषी महाविद्यालय होणार असल्याचे स्पष्ट केले. नगर जिल्हा कृषी प्रधान असून, जिल्हातील काही भागात दुष्काळी तालुके आहेत. या दुष्काळी तालुक्यांत पाणी पोहचले पाहिजे, या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील 11 हजार गावे जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून दुष्काळमुक्त करण्यात आली आहेत.

 त्याचप्रमाणे जिल्हा टँकरमुक्त करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील 1 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. तसेच 12 हजार शेततळी, 5 हजार विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
राज्यातील शेतकरी स्वावलंबी झाला पाहिजे, यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील असून, कर्ज माफीमध्ये जिल्ह्यातील 2 लाख 42 हजार शेतकरी पात्र ठरले आहेत. यातील 1 लाख 62 हजार शेतकर्‍यांच्या खात्यांत पैसे जमा करण्यात आले आहेत. जिल्ह्यात असे एकूण 800 कोटी रुपये खात्यांत जमा करण्यात आले आहेत. शासनाकडून शेतकर्‍यांना वेगवेगळ्या माध्यमातून मदत केली आहे. परंतु, फक्त मदतीच्या आधारावर शेतकरी समृद्ध होणार नाही. त्यासाठी आधुनिक पद्धतीने शेती होण्यासाठीी शेतीला पूरक उद्योगधंद्यांची जोड द्यावी लागणार आहे. त्यासाठी शेतकर्‍यांच्या मुलांनी उच्च दर्जाचे ज्ञान घेऊन शेती करावी. 

जामखेड या दुष्काळी तालुक्याला कुकडीचे पाणी मिळण्यासाठी पालकमंत्री राम शिंदे यांनी सतत पाठपुरावा केला आहे. त्यांच्या या पाठपुराव्याला नक्कीच यश मिळेल, याची खात्री मी देतो. सदरचा हा प्रस्ताव समितीपुढे ठेवण्यात आला आहे. याबरोबरच जिल्ह्यातील निळवंडे धरणासाठी 500 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच वांबोरी चारीचा प्रश्‍नही लवकरच मार्गी लावू. ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांचा सर्व माल घेईपर्यंत कोणतेही केंद्र बंद न करण्याचे आदेश  त्यांनी जिल्हाधिकारी अभय महाजन यांना दिले. पालकमंत्री शिंदे यांनी केंद्र बंद न करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. तालुक्यातील भारत बटालियन केंद्र मंजूर असून, काही अटी व शर्तींची पूर्तता करून हा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला जाईल. तसेच जामखेड शहराचे चित्र बदलण्यासाठी 25 कोटींचा निधी उपलब्ध करून देऊ, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले. 

पालकमंत्री राम शिंदे म्हणाले की, कोरडवाहू दुष्काळी भागाला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नववर्षाच्या मुहूर्तावर कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून भेट दिली आहे. जामखेड तालुक्याचे विविध प्रश्‍न मांडले. अनेक वर्षांपासून मागणी असलेले कुकडीचे 2 टीएमसी पाणी देण्यात यावे. उडीद, मका, सोयाबीन खरेदी केंद्रांना मुदतवाढ मिळावी. भारत बटालियन केंद्राचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून त्याला तात्काळ मंजूरी द्यावी. जामखेड शहराच्या विकासासाठी नगरपरिषदेला विशेष निधी मिळावा, अशा विविध मागण्या मुख्यमंत्र्यांकडे केल्या. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले की, राज्य सरकार हे बहुजन समाजाचे सरकार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिले आहे. तळागाळातील लोकांना समोर ठेवून ते जनहिताचे निर्णय घेत आहेत. राज्यात जलसंधारणाचे काम राम शिंदे यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे झाल्याने दुष्काळ जाणवला नाही. यावेळी पालकमंत्री राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा सपत्नीक सत्कार केला. यावेळी तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.