Tue, Jul 16, 2019 22:10होमपेज › Ahamadnagar › जिल्ह्यात भाजपला ‘हादरा’ देणार!

जिल्ह्यात भाजपला ‘हादरा’ देणार!

Published On: Aug 25 2018 1:12AM | Last Updated: Aug 25 2018 1:12AMनगर : प्रतिनिधी

देशात मध्यंतरी आलेल्या ‘लाटेत’ पक्षातील काही नेते ‘इकडचे- तिकडे’ गेले. पण लाटेचा ‘प्रभाव’ आता ओसरत आला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विरोधी पक्ष व भाजपला राष्ट्रवादीच्या माध्यमातून ‘हादरा’ देणार असल्याचा सूचक इशारा राष्ट्रवादीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिला.

जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच पत्रकारांशी फाळके यांनी राष्ट्र्रवादी भवनात संवाद साधला. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, माजी आ. दादाभाऊ कळमकर, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, सरचिटणीस अंबादास गारूडकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, अरूण कडू, शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, शारदा लगड, बाळासाहेब जगताप आदी उपस्थित होते. घुले यांनी फाळके यांच्याकडे पदभार सोपवून त्यांना शुभेच्छा दिल्या.

फाळके म्हणाले की, पक्षाने जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविल्याने मोठी जबाबदारी आली असून, पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. जिल्ह्यातील 12 विधानसभा व 2 लोकसभा मतदारसंघात पूर्वीपासूनच राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी झाली तर ठीक, नसता सर्वच्या सर्व मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची तयारी पक्षाने केली आहे. मोठा जिल्हा असल्याने काम करणे आव्हानच आहे. महापालिकेतही राष्ट्रवादीची एकहाती सत्ता येणार असल्याची ‘भविष्यवाणी’ फाळके यांनी केली.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेंचे चिरंजीव सुजय यांनी निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे. त्यावर बोलतांना फाळके म्हणाले की, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात पूर्वी राष्ट्रवादीचा खासदार निवडून आलेला आहे. तसेच दक्षिणेतील 6 पैकी 2 विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तर चार मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचाच हक्क आहे. त्यामुळे दक्षिण लोकसभेसाठी पूर्ण ताकदीने पक्ष उतरणार आहे. लोकसभा मतदारसंघ बदलण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असून, पक्ष देईल ते काम करणार आहोत.

पक्षात वाद असल्याची दिली कबुली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत वाद असल्याची कबुलीच नवनियुक्त जिल्हाध्यक्ष फाळकेंनी दिली. नाराजांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे ते म्हणाले. मात्र, पक्ष हे घर असून, घरातील वाद घरातच मिटविण्यात येतील असेही त्यांनी सांगितले. जुन्या व नव्या कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश देतांना वरिष्ठ व स्थानिक पातळीवर चर्चा करूनच निर्णय घेणार असल्याचा खुलासा त्यांनी केला.

तालुक्यांचा दौरा, ‘वन बूथ, टेन युथ’चा नारा

प्रत्येक तालुक्यांत व जिल्हा पातळीवर नव्याने कार्यकारिणी करण्यात येणार असून, त्यासाठी प्रत्येक तालुक्यांत चार दिवसांचा दौरा करणार आहे. जिल्हा कार्यकारिणी पुढील 15 दिवसांत जाहीर होईल. ‘वन बूथ टेन युथ’ या संकल्पनेवर पुढील एक महिन्यात काम करण्यात येणार असून, ‘एनसीपी कनेक्ट’ या अ‍ॅपवर बूथ कमिट्यांची माहिती भरण्यात येईल. मतदारसंघ प्रमुख, तालुका प्रमुख, बुथप्रमुख व बूथ सदस्य अशी पक्षाची बांधणी करण्यात येणार असल्याचे फाळके यांनी सांगितले.