शहरात बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ

Last Updated: Jun 07 2020 1:37AM
Responsive image


नगर : पुढारी वृत्तसेवा

शहरातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत शनिवारी (दि.6) पुन्हा वाढ झाली आहे. माळीवाडा परिसरात एक व कोठी परिसरात आणखी दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या 46 वर पोहचली आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना संसर्ग झाल्याचे समोर येत आहे. शहरातील गर्दीवर नियंत्रण राखणे व त्यासाठी उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने, भविष्यात शहरातील सामाजिक संसर्ग रोखण्याचे आव्हान महापालिका प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

नगर शहरामध्ये विविध भागात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. मागील काही दिवसांत माळीवाड्यात सर्वाधिक 11 रुग्ण आढळून आले आहेत. तर भवानीनगर येथे 5, कोठी येथे 3, सथ्था कॉलनीत 5 व केडगाव येथे 4 रुग्ण आढळून आले आहेत. बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे संसर्ग झालेल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे शहरात सामाजिक संसर्गाला सुरुवात झाल्याचे  चित्र आहे. असे असताना उपाययोजनांकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे.

मध्य शहरात दाट लोकवस्ती  व भाजी मार्केट, बाजारपेठा आहेत. लॉकडाऊनमध्ये सवलत देण्यात आल्यामुळे बाजारपेठेतील दुकाने उघडण्यात आली आहेत. सोशल डिस्टन्सिंग राखणे, मास्कचा वापर करणे आदी विविध सूचना मनपाकडून देण्यात आल्या आहेत. कारवाईचा इशाराही देण्यात आलेला आहे. मात्र, अद्यापही शहरातील रस्त्यावर गर्दी कायम आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास भविष्यात शहरातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता आहे.

शहरातील या भागात आहेत कोरोनाचे रुग्ण

शहरातील विविध भागात कोरोना बाधित रुग्ण आहेत. माळीवाड्यात 11, सथ्था कॉलनी 5, केडगाव 4 तर भवानीनगरमध्ये 5 रुग्ण आहेत. यापूर्वी मुकुंदनगर, झेंडीगेट, जुनी मनपा कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आलेले आहेत. तसेच सारसनगर येथे पूर्वी दोन व आता एक रुग्ण आढळून आलेला आहे. बालिकाश्रम रोड, सर्जेपुरा, दातरंगे मळा परिसरातही यापूर्वी रुग्ण आढळून आलेले आहेत.

प्रभागनिहाय तपासणी, सर्वेक्षण आवश्यक

शहरात भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी आतापासूनच सर्व प्रभागांमध्ये तपासणी, सर्वेक्षण सुरू करण्याची गरज आहे. बाधित रुग्ण शोधून त्या भागात आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात आणखी काही भागात रुग्ण आढळल्यास परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यात आहे. लोकप्रतिनिधी, पदाधिकार्‍यांनी यात लक्ष घालण्याची गरज आहे.

संपर्कात येणार्‍यांची सरसकट तपासणी करावी

जिल्ह्यात क्वॉरंटाईन सेंटरमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. अशीच काहीशी परिस्थिती नगरमध्येही होण्याची दाट शक्यता आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचीच स्त्राव तपासणी होणे गरजेचे आहे. मात्र, हाय रिस्क, लो रिस्क विभागणी करून काहींना केवळ क्वारंटाईन केले जात आहे. वास्तविक संपर्कात आलेल्या सर्वांचीच तपासणी होणे गरजेचे आहे. मात्र, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे.