Wed, Sep 26, 2018 16:06होमपेज › Ahamadnagar › नगर : वाळू वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर पकडले 

नगर : वाळू वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर पकडले 

Published On: Dec 01 2017 8:31AM | Last Updated: Dec 01 2017 8:31AM

बुकमार्क करा

जामखेड ः प्रतिनिधी

तालुक्यातील विविध ठिकाणांवरून अवैध वाळू उपसा करणारे चार ट्रॅक्टर महसूल विभागाने विविध ठिकाणांहून जप्त केली. त्यामुळे वाळू तस्करांत खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील दहा ठिकाणच्या नदीपात्रांत वाळूसाठे आहेत. यातील आघी व चोंडी येथील वाळूसाठ्याचा लिलाव झाले असून, ते अद्याप चालू झाले नाहीत. वांजरा, खैरी, विंचरणा, सीना तसेच जवळा व नान्नज येथील नदीपात्रांतून वाळूची ट्रॅक्टर, ट्रक, टेंपोद्वारे चोरटी वाळू वाहतूक केली जात आहे. दिघोळ येथील वांजरा नदीत वाळू उपासणारी बोट लावून वाळू वाहतूक करण्याचा वाळूतस्करांचा प्रयत्न दिघोळ ग्रामस्थांनी उधळून लावला होता. त्यामुळे महसूल यंत्रणा खडबडून जागी झाली. तसेच वरिष्ठ पातळीवरून महसूल प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यामुळे महसूल पथकाने ठिकठिकाणांवरून चार ट्रॅक्टर वाळूसह ताब्यात घेतले आहेच. त्यांना प्रशासन किती दंड करते व अवैध चोरटी वाळू वाहतूक कशी रोखली जाते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

यापूर्वी दिघोळ येथील वांजरा नदीपात्रातून वाळू उपसा करणारी बोट व मशिनरी आल्याने गावामध्ये चर्चेला उधाण आले आहे. याबाबत पोलिस पाटील यांनी तहसीलदार विजय भंडारी यांना माहिती दिली. भंडारी यांनी संबंधित तलाठ्यास चौकशी करण्यासाठी पाठवले होते. परंतु वाळूचा उपसा अद्याप केला नसल्याने कारवाई केली गेली नसून, समज देण्यात आली असल्याचे  भंडारी यांनी सांगितले होते. 

तालुक्यातील फक्राबाद, धानोरा, वंजारवाडी, खामगाव या शिवारात मोठ्या प्रमाणावर वाळूसाठा आहे. आतापर्यंत कारवाई केलेल्यांना दंडाच्या नोटिसा बजावल्या. परंतु एक रुपयांचा दंड अद्याप कोणी भरला नाही. आजही मोठ्या प्रमाणावर या परिसरात वाळूसाठा करण्यात येत आहे. मात्र त्याकडे महसूल विभाग दुर्लक्ष होत आहे.