Wed, May 22, 2019 17:08होमपेज › Ahamadnagar › अनास्थेने आदर्श विद्यालय अडचणीत

अनास्थेने आदर्श विद्यालय अडचणीत

Published On: May 08 2018 1:54AM | Last Updated: May 08 2018 12:29AMअकोले : प्रतिनिधी

दर्जेदार शिक्षणासाठी भंडारदरा, अकोले (अहमदनगर) येथे सुरू करण्यात आलेल्या अभिनव विद्यालयाची सरकारच्या अनास्थेमुळे आज दुरवस्था झाली आहे. समाजाला अनेक डॉक्टर, वकील, अभियंते व अधिकारी देणार्‍या या विद्यालयाची परिस्थिती दयनीय आहे. मागील 27 वर्षांच्या कालावधीत शाळेसाठी इमारत व इतर पायाभूत सुविधा पुरविण्यात अपयशी ठरलेल्या आदिवासी विकास विभागाने भाड्याच्या जागेतील ही शाळा अखेर आदिवासी आश्रमशाळेत हलविण्याचा निर्णय घेतला आहे. 

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी शाळेच्या बळकटीकरणासाठी आवश्यक इमारत, वसतिगृह, शिक्षकांची निवास व्यवस्था, ग्रंथालय, मैदान व इतर पायाभूत सोयी-सुविधांची उभारणी करण्यासाठी आवश्यक आराखडा तात्काळ तयार करावा, अशी मागणी आदिवासी विकास व सुरक्षा असोसिएशनच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन संस्थेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र उमाकांत तळपे यांनी आदिवासी आयुक्तांना दिले आहे.

सन 1990-91 मध्ये राज्य सरकारने आदिवासी विभागांतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांमधून प्रशासकीय अधिकारी निर्माण व्हावेत, या उद्देशाने महाराष्ट्रातील भंडारदरा, अकोले (अहमदनगर) व देवमोगरा, नवापूर (नंदूरबार) येथे अभिनव विद्यालय सुरु केले. हे विद्यालय दर्जेदार शिक्षणासाठी ओळखले जाते. भंडारदरा, अकोले (अहमदनगर) येथील विद्यालयात नाशिक, ठाणे, पुणे, नांदेड, अमरावती अशा राज्यातील विविध भागांतून मुले शिक्षणासाठी प्रामुख्याने येतात. 

देवमोगरा, नवापूर (नंदूरबार) येथे सुरू करण्यात आलेल्या विद्यालयाची आज सुसज्ज इमारत उभी असून शाळा चांगल्या पद्धतीने चालू आहे. मात्र, भंडारदरा येथे मंजूर झालेल्या या विद्यालयाची राजकीय अनास्था तसेच आदिवासी विकास विभागाच्या अधिकार्‍यांचे दुर्लक्ष व अकार्यक्षमतेमुळे वाताहत झाली. मागील 27 वर्षांच्या काळात आदिवासी विकास विभागाने हे विद्यालय सक्षम व बळकट करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. सुरूवातीपासूनच भाडोत्री जागेत असलेले हे विद्यालय जून 2002 पासून विद्यार्थी मागणीच्या नावाखाली अकोले येथे स्थलांतरित करण्यात आले. सुरुवातीपासून आजही शाळा भाड्याच्याच जागेत भरत होती.

मात्र, जून 2018 पासून हे विद्यालय एकलव्य संकुल, मवेशी येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. शासकीय आश्रमशाळा, मवेशी व एकलव्य विद्यालय या दोन संस्था एकाच संकुलात आहेत. दोन्ही संस्थांच्या स्वतंत्र इमारती देखील येथे अस्तित्त्वात आहेत. मात्र, 27 वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या भंडारदरा, अकोले (अहमदनगर) अभिनव विद्यालयाचे स्थान या संकुलामध्ये काय असणार हे निश्चित करण्यात आलेले नाही. हे विद्यालय स्वतंत्रपणे चालवले जाणार की, आश्रमशाळेत समायोजन केले जाणार याबाबत कोणतीही माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आलेली नाही. तसेच या विद्यालयासाठी आवश्यक इमारत, वसतिगृह व इतर सुविधा किती कालावधीत उपलब्ध होणार याबाबतही कोणतीही कल्पना पालक व विद्यार्थ्यांना देण्यात आली नाही. प्रशासनाने कोणतेही निर्णय घेताना संबंधित घटकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. मात्र, याबाबत योग्य ती कार्यवाही केलेली दिसत नाही. 

त्यामुळे विद्यालयाच्या बळकटीकरणासाठी आवश्यक आराखडा तात्काळ तयार करावा. तयार केलेल्या आराखड्याची कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी करावी. तसेच कोणताही निर्णय घेताना विद्यार्थी व पालकांना विश्वासात घ्यावे, अन्यथा याबाबत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते रवींद्र उमाकांत तळपे यांनी दिली.