Tue, May 21, 2019 00:15होमपेज › Ahamadnagar › जिल्ह्यात टंचाईग्रस्त तालुक्यांतील आठ टँकर झाले बंद  

८ दिवसांत १०० मिमी पाऊस

Published On: Jun 28 2018 1:32AM | Last Updated: Jun 27 2018 11:58PMनगर : प्रतिनिधी

गेल्या आठ दिवसांत जिल्हाभरात सरासरी शंभर मि.मी. पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची खरीप पेरणीसाठी धावपळ सुरु झाली आहे.आतापर्यंत जिल्हाभरात 29 टक्के पावसाची नोंद झाली आहे.दरम्यान, या पावसामुळे टँकरची संख्या कमी होवू लागली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला नसल्याने, शेतकरी वर्ग धास्तावला. खरीप हंगाम यंदा हाती लागत नाही, अशी खूणगाठ बांधली जात असतानाच, मृग नक्षत्राने जाता जाता गुरुवारी (दि.21) जोरदार निरोप दिला.  या मृगाच्या पावसाने जिल्हा चांगलाच ओलाचिंब झाला. आर्द्राने देखील शुक्रवारी (दि.22) जोरदार सलामी देत जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या आशा पल्‍लवीत केल्या.

गुरुवारी  सरासरी 33 मि.मी.,  शुक्रवारी  जिल्हाभरात सरासरी 13.41 मि.मी. तर शनिवारी सरासरी 26.26 मि.मी. पावसाची नोंद झाली. गेल्या दोन दिवसापूर्वी देखील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. 19 जूनपर्यंत जिल्हाभरात फक्‍त 46.42 मि.मी.(9 टक्के)  पावसाची नोंद झाली होती. गेल्या आठ दिवसांत झालेल्या सर्वदूर पावसाने जिल्ह्यातील पावसाची टक्केवारी आता 29 वर गेली आहे. गेल्या आठ दिवसांच्या पावसाने शेतकरी वर्गाला चांगला दिलासा दिला आहे.या पावसाने शेतकरी आता पेरते झाले आहेत. पावसाअभावी गेले काही दिवस शेतकरी बी-बियाणे व खत विक्री केंद्रांकडे फिरकत नव्हते. आता मात्र शहरातील ही दुकाने शेतकर्‍यांच्या गर्दीने फुलू लागली आहेत. 

23 जूनपर्यंत जिल्हाभरातील 64 गावे आणि 241 वाड्यांसाठी 75 टँकर धावत होते. गेल्या काही दिवसांच्या पावसामुळे काही टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळाला आहे. पावसामुळे नगर व अकोले तालुक्यातील प्रत्येकी एक,  पारनेर व पाथर्डी या तालुक्यातील प्रत्येकी तीन असे एकूण आठ टँकर बंद झाले आहेत.