Fri, Apr 19, 2019 11:56होमपेज › Ahamadnagar › शाळेतून काढून टाकण्याच्या धमकीने मुलीवर अत्याचार

शाळेतून काढून टाकण्याच्या धमकीने मुलीवर अत्याचार

Published On: Jan 24 2018 8:06PM | Last Updated: Jan 24 2018 10:41PMनगर : प्रतिनिधी

शाळेतून काढून टाकण्याची धमकी देऊन नाईट स्कूलच्या मुख्याध्यापकाने दलित विद्यार्थिनीवर शारीरिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. तीन वर्षांपासून हा अत्याचार सुरू होता. याबाबत काल (दि. 24) सायंकाळी कोतवाली पोलिस ठाण्यात पांडुरंग कुंडलिक गवळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, गवळी हा शहरातील एका नाईट स्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून नोकरी करतो. सन 2015 मध्ये पीडित विद्यार्थिनीने इयत्ता आठवीत प्रवेश घेतला होता. मुख्याध्यापक गवळी हा त्याच्या दुचाकीवरून सदर विद्यार्थिनीला तिच्या घरून शाळेत नेत व आणून सोडत होता. काही दिवसांनंतर गवळी याने या विद्यार्थिनीला त्याच्या घरी नेऊन तेथे तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. हा प्रकार सदर मुलीने कोणाला सांगू नये, यासाठी शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर दर रविवारी सदर मुलीला गवळी त्याच्या घरी घेऊन शारीरिक अत्याचार करीत होता. हा प्रकार कोणाला सांगितल्यावर मुख्याध्यापक शाळेतून काढून टाकीन, या भीतीने हा प्रकार त्या मुलीने कोणालाच कळू दिला नाही. 

काही दिवसानंतर मुख्याध्यापक गवळी हा पीडित विद्यार्थिनीला भुईकोट किल्ला व कृषी उत्पन्न बाजार समिती येथील मंदिराच्या बाजूला नेऊन अत्याचार करीत होता. सततच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने शाळेत जाणे सोडून दिले व सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. मागच्या वर्षी सदर विद्यार्थिनीने मुख्याध्यापक गवळी याच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात छेडछाड केल्याची फिर्याद दिलेली आहे. त्यानंतर पुन्हा आरोपी मुख्याध्यापकाने पीडित विद्यार्थिनीशी व्यवस्थित बोलून जवळीक निर्माण केली व तिला बाहेर फिरायला घेऊन जाऊ लागला.

सहा महिन्यांपूर्वी विद्यार्थिनीला भाड्याने खोली घेऊन दिली. लग्नाचे आमिष दाखवून तेथेही तिच्यावर शारीरिक अत्याचार सुरू होता. 19 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता विद्यार्थिनीने मुख्याध्यापकाला लग्नाबाबत विचारणा केली. त्यानंतर मारहाण करून तो तेथून निघून गेला. पुन्हा परतलाच नाही. त्यामुळे विद्यार्थिनी तिच्या आईकडे निघून गेली. तिने बुधवारी (दि. 24) कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पांडुरंग गवळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे हे करीत आहेत.