Mon, Apr 22, 2019 03:44होमपेज › Ahamadnagar › विद्यार्थ्याच्या तोंडात कोंबली छडी!

विद्यार्थ्याच्या तोंडात कोंबली छडी!

Published On: Apr 14 2018 1:43AM | Last Updated: Apr 13 2018 11:34PMकर्जत : प्रतिनिधी

शाळेत गणित चुकल्याने शिक्षकाने आठ वर्षीय विद्यार्थ्याच्या तोंडात लाकडी छडी कोंबल्याने त्याच्या अन्ननलिका व श्वासनलिकेस गंभीर इजा झाली आहे. जखमी विद्यार्थ्यास पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहन दत्तात्रय जंजिरे (वय 8, रा. पिंपळवाडी, ता. कर्जत) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे, तर चंद्रकात सोपान शिंदे असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. याबाबत रोहनची आई सुनीता दत्तात्रय जंजिरे यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पिंपळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत त्यांचा मुलगा रोहन हा इयत्ता दुसरीमध्ये शिकत आहे. शाळा सुरू असताना वर्गामध्ये रोहनचे गणित सोडवताना चुकले. त्याचा राग आल्याने शिक्षक चंद्रकात सोपान शिंदे याने ‘तुला काहीच कसे येत नाही’, असे म्हणून हातामध्ये असलेली लाकडी छडी रोहनच्या तोंडामध्ये कोंबली. अचानक लाकडी छडी तोंडात घुसविल्याने रोहन जोरात ओरडला असता, त्या छडीमुळे रोहनच्या अन्ननलिका व श्वासनलिकेला गंभीर इजा झाली आहे. 

तोंडात इजा झाल्याने रोहन यास बोलता येईना. यामुळे सर्वांची एकच धावपळ उडली. त्याला प्रथम राशीन येथे खासगी रुग्णालयामध्ये नेण्यात आले. तेथून नंतर बारामती येथे नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी रोहनची जखम गंभीर असल्याने, त्यास पुणे येथे रूबी हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले. त्यानंतर रोहनला रूबी रुग्णालयात हलविण्यात आले असून, तेथे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपाचार सुरू आहेत. 

जखमी रोहनचे वडील दत्तात्रय जंजीरे यांनी पालकमंत्री प्रा. राम शिंदे व सरकारने तातडीने तज्ज्ञ डॉक्टारांचे पथक रुग्णालयात पाठवावे, अशी मागणी केली आहे.या घटनेनंतर तालुका गटशिक्षण अधिकारी शिंदे यांनी पिंपळवाडी शाळेला भेट देवून सर्व माहिती घेतली. रोहनच्या वर्गातील विद्यार्थी व इतर शिक्षकांचेे जबाबही त्यांनी घेतले आहेत. रोहनच्या आईच्या फिर्यादीवरून कर्जत पोलिसांनी शिक्षक चंद्रकात सोपान शिंदे याच्याविरूद्ध भा.दं.वि. कलम 234 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे 

Tags : Ahmadnagar, hard, punishment, student, injured