Sun, Jul 21, 2019 09:51होमपेज › Ahamadnagar › जिल्ह्यातील २६ गावांत महिलांतच झुंज

जिल्ह्यातील २६ गावांत महिलांतच झुंज

Published On: Dec 02 2017 1:03AM | Last Updated: Dec 02 2017 12:58AM

बुकमार्क करा

नगर ः प्रतिनिधी

येत्या 26 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील 67 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे या गावांत ऐन थंडीत राजकीय वातावरण तापले आहे. सरपंचपदाची थेट निवडणूक होणार असल्यामुळे या निवडणुकीला अधिकच महत्त्व आले आहे. या निवडणुकीत कोळगाव, दाढ बु.,दर्गापूर, हिवरेझरे, आरणगाव आदींसह 26 गावांचे सरपंचपद महिलांसाठी राखीव असल्याने या ठिकाणी महिलांमध्येच झुंज होणार आहे. 18 ग्रामपंचायतींचे सरपंचपद सर्वसाधारण व्यक्तीसाठी राखीव असल्याने, या ठिकाणी मात्र चुरशीच्या निवडणुका होणार आहेत.

माहे जानेवारी व फेब्रुवारी 2018 या महिन्यात मुदत संपणार्‍या जिल्ह्यातील एकूण 67 ग्रामपंचायतींच्या निवडणुका 26 डिसेंबरमध्ये होणार आहेत. या गावांतील अंतिम मतदारयादी देखील जाहीर झाली आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची अ नोटीस देखील तहसीलदारांनी प्रसिध्द केली आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी गावागावांतील वातावरण तापले आहे. सरपंचपदाची व सदस्यपदाची उमेदवारी मिळावी, यासाठी कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.

श्रीगोंदा तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल जगताप यांच्या कोळगाव ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. सरपंचपद अनुसूचित जाती प्रवर्गाच्या महिलेसाठी राखीव आहे. श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव राजकीयदृष्ट्या अधिक जागृत आहे. इंद्रभान थोरात व आबासाहेब थोरात या दोन माजी पंचायत समिती सभापतींच्या गटातच लढत होणार आहे. सरपंचपद हे खुले असल्याने येथील निवडणूक अधिकच चुरशीची होणार आहे.

67 ग्रामपंचायतींपैकी तब्बल 26 ग्रामपंचायतींचे सरपंचपद हे महिलासाठी राखीव आहे. त्यामुळे या ठिकाणी फक्त महिलांमध्येच चुरशीची लढत होणार आहे. गावपातळीवरील नेत्यांनी आपल्याच घरी सरपंचपदाची उमेदवारी मिळावी, यासाठी तालुक्यांतील गॉडफादर नेत्यांची मतधरणी सुरु केली आहे. या निवडणुकीत 18 ग्रामपंचायतींचे सरपंचपद हे खुले आहे. त्यामुळे आश्‍वी खुर्द,सडे,रस्तापूर,देवदैठण,निंबोडी, मेहेकरी, पिंप्री निर्मळ,विसापूर आदी गावांत मात्र  सरपंचपदाची निवडणूक अटीतटीची होणार आहे.

नागरिकांचा मागास प्रवर्गातील व्यक्तींसाठी कुंभारी, कोर्‍हाळे, गुजरवाडी, चिंचोली, फत्याबाद, मुंगी, कुंभेफळ आदींसह  18 ग्रामपंचायतींचे सरपंचपद राखीव आहे. त्यामुळे सरपंचपदाची निवडणूक लढविणार्‍यांनी ओबीसी जातप्रमाणपत्र काढण्यासाठी धावपळ सुरु केली आहे.अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्तींसाठी 9 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातील व्यक्तीसाठी 4 ग्रामपंचायतींचे सरपंचपद  राखीव आहे.