Sun, May 26, 2019 18:41होमपेज › Ahamadnagar › हरभरा हमीभाव खरेदी केंद्रांना १३पर्यंत मुदतवाढ

हरभरा हमीभाव खरेदी केंद्रांना १३पर्यंत मुदतवाढ

Published On: Jun 07 2018 2:04AM | Last Updated: Jun 06 2018 11:17PMनगर : प्रतिनिधी

हरभरा खरेदी हमी भाव केंद्रांना नाफेडने येत्या 13 जूनपर्यंत मुदतवाढ दिल्याने नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.गेल्या 29 मे रोजी ही केंद्रे बंद झाल्यानंतर हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांनी मिळेल त्या भावात हरभर्‍याची विक्री केली होती. काही शेतकर्‍यांनी मात्र मुदतवाढ मिळेल, या आशेवर हरभर्‍याची विक्री केली नव्हती.

राज्य सरकारच्या आदेशानंतर नाफेडने नगर जिल्ह्यात हरभरा खरेदीसाठी हमी भाव केंद्रे सुरू केली होती.या केंद्रावर शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात हरभरा विक्री केली. काही शेतकर्‍यांनी नोंदणी करूनही त्यांना बाजार समित्यांकडून एसएमएसद्वारे हरभरा विक्रीसाठी आणण्याच्या सूचना गेल्या नाहीत. परिणामी हे शेतकरी एसएमएसची प्रतीक्षा करीत बसले. काही शेतकर्‍यांनी बाजार समितीच्या कर्मचार्‍यांना हाताशी धरून हरभर्‍याची विक्री केली. अजूनही बर्‍याच शेतकर्‍यांकडे हरभरा आहे. त्यांनी नोंदणीही केली असून, त्यांना मुदतवाढीबद्दल प्रतीक्षा होती. शेतकर्‍यांची मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने हमीभाव हरभरा खरेदी केंद्रांना 13 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

नगर जिल्ह्यात नगर तालुका व नेवासा बाजार समिती, राहुरी, श्रीगोंदा, राहाता,  कोपरगाव,कर्जत व पारनेर तालुका खरेदी-विक्री संघ, जगदंबा महिला ग्राहक संस्था, शेवगाव,श्रीरामपूर प्रगत बागायतदार संस्था, पुण्यश्‍लोक कृषी प्रक्रिया  संस्था, जामखेड व विविध कार्यकारी सेवा संस्था निमगाव डाकू (ता. कर्जत) या संस्थांच्या हरभरा हमी भाव केंद्रांना नाफेडने मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हमीभाव केंद्रांवर 4400 रुपये हरभर्‍यास भाव मिळत असून, बाजारात 3200 रुपये क्विंटलप्रमाणे खरेदी करण्यात येत असल्याचे शेतकर्‍यांकडून सांगण्यात आले. 

नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार केंद्रावर 2560 शेतकर्‍यांनी नोंदणी केली असून, आतापर्यंत1194 शेतकर्‍यांची 11 हजार 391 क्विंटल हरभर्‍याची खरेदी करण्यात आली आहे. उर्वरित शेतकर्‍यांचाही हरभरा खरेदी केला जाईल, असे बाजार समितीचे सभापती विलास शिंदे, उपसभापती रेश्मा चोभे व सचिव अभय भिसे यांनी सांगितले.