संगमनेर : प्रतिनिधी
शेतकऱ्याच्या उत्पादित शेतमालाल हमी भाव दिला जाईल असे आश्वासन देत केंद्रातील मोदी सरकार सत्तेवर आले. सत्तेवर आल्यानंतर या सरकारने शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव देण्याएवजी शेतकरी विरोधी धोरणे राबवले. देशातील शेतकर्यांना देशोधडीला लावल्यामुळे शेतकर्यांना अच्छे दिनाएवजी बुरे दिन आणल्याची खरमरीत टीका शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी मोदी सरकारवर केली.
यावेळी खा. शेट्टी यांनी कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांना पहिली उचल जादा देण्यास परवडते तसेच नंदुरबारसारख्या आदिवासी जिल्ह्यात उसाचे उत्पादन कमी असतानादेखील त्या साखर कारखान्यानासुद्धा ज्यास्त भाव देतात. नगर जिल्ह्यातील साखर कारखानदारांना त्यांच्या बरोबरीने पहिली उचल देण्यास का परवडत नाही असा प्रतिसवाल करून त्यांनी नगर जिल्ह्यातील साखर सम्राटांना पांढऱ्या कपड्यातील दरोडेखोर अशी उपमा देत त्याच्यावर टीकेची झोड उठवली.
उसाच्या भावासंदर्भात चर्चा करण्यासाठी उच्च स्तरीय समिती गठीत केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. याबाबत शेट्टी यांनी समित्या गठीत करणे म्हणजे सरकारचे वेळ काढू पणाचे धोरण असल्याचे सांगितले. उसाचा भाव जाहीर करण्यासाठी अशा समित्या स्थापण्याची काहीच गरज नाही. याबाबत बैठक नागपूरला घेण्याचीसुद्धा गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याचे आश्वासन देत सत्ता मिळवली, मात्र सत्तेवर आल्यानंतर मोदी सरकार शेतकर्यांच्या शेतमालाला हमी भाव देऊ शकले नाही उलट बाहेरील देशातून शेतमाल मागविला निर्यात बंद केली. भारताचा शत्रू असलेल्या पाकिस्तानातून कांदा मागविण्यात आला, असे अनेक शेतकरी विरोधी धोरणे मोदी सरकारने राबविले आहे.
राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींनी आमच्या वाट्याला जे दुःख आले, ते दुसऱ्या महिलांच्या वाट्याला येऊ नये यासाठी किसान संसदेच्या माध्यमातून आगामी होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव हे दोन विधायके मांडणार आहे. त्याचे प्रबोधन करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते राज्यभर फिरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्जमाफीचे फॉर्म ऑनलाईन केल्यामुळे मोठा घोटाळा झाला आहे. कर्जमाफीच्या नावाखाली शेतकर्यांची सरकारने फसवणूक करून त्यांच्या भावनांचा खेळ करीत असल्याची टीकाही शेट्टी यांनी केली।
नाना पटोले यांचा भ्रमनिरास
भाजपचे भंडारा जिल्ह्यातील खा नाना पटोले यांनी खासदारकीसह भाजपचा राजीनामा दिल्याबद्दल राजू शेट्टी यांना विचारले असता त्यांनी नाना पटोले हे तसे मूळचे काँग्रेसचेच. ते मोठी अपेक्षा घेऊन काँग्रेसमधून भाजपात आले होते, परंतू भाजपात आल्यानंतर त्यांना भाजपचा मुखवटा वेगळा असल्याचे लक्षात आले. भाजपबाबत भ्रमनिरास झाल्यानेच त्यांनी राजीनामा दलिा असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.