होमपेज › Ahamadnagar › सरकारमुळेच आंदोलनाचा वणवा

सरकारमुळेच आंदोलनाचा वणवा

Published On: Aug 10 2018 12:56AM | Last Updated: Aug 10 2018 12:56AMनगर : प्रतिनिधी 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज आंदोलनाचा जो वणवा पेटला आहे, त्याला सरकार कारणीभूत आहे. सरकारने घोषणा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती केली असती तर ही वेळ आली नसती. समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न असून, सरकार भरकटत चालले असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी गुरुवारी (दि. 9) येथे केली.

मराठा संघटनांच्या महाराष्ट्र बंद आंदोलनाला पाठिंबा देतानाच विरोधी पक्षनेते विखे यांनी गुरूवारी नगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित चक्‍का जाम आंदोलनात सहभाग घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विखे बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली. सरकार वेळकाढूपणा करीत असल्याने त्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत आहेत. 

आरक्षण व इतर मागण्यांसाठी मराठा समाजाचे 58 मोर्चे निघाले. मात्र, सरकारने मराठा समाजाला ग्राह्य धरण्यास सुरुवात केली. सध्या सुरू असलेले आंदोलन हा आरक्षणाचे आश्‍वासन देणार्‍या सरकारला इशारा आहे, असे विखे म्हणाले. 

सर्वांना एकाच छताखाली येऊन सरकारवर दबाव निर्माण करावा लागेल. आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे सरसकट मागे घेण्याची सरकारने घोषणा केली असली, तरी गुन्हे मागे घेण्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्याची गरज आहे. सरकारची धोरणे फसवणूक करणारी आहेत. घोषणा करण्याऐवजी कृती हवी, सरकारने सत्तेत आल्यावर कायदा विधानसभेत आणला तो आमच्या काळात काढलेल्या अध्यादेशानुसारच. त्यातील त्रूटी दूर करण्यासाठी वेळ देण्याची विनंती न्यायालयाकडे करायला हवी होती. धनगर आरक्षणावरही चार वर्षांत निर्णय घेण्यात आला नाही. मुस्लिम आरक्षणाचा अध्यादेश रद्द केला. सरकार जे बोलतं ते करत नाही. आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. 14 महिने कोर्टात अ‍ॅफिडेव्हिट दाखल केले नाही. मागासवर्गीय आयोगाला पूर्णवेळ सचिव दिला नाही,असे ते म्हणाले.

महामंडळाद्वारे कर्ज, क्रिमीलेअर मर्यादा वाढवली, विद्यार्थ्यांसाठी होस्टेल करणार, यापेक्षा राज्यात फी ची सवलत लागू केली तर, आर्थिक आधार समाजातील मुलांना मिळेल. फीचा परतावा सरकारने द्यावा. मराठा समाजाला 52 टक्क्यांत आरक्षण नको. 16 टक्के स्वतंत्र आरक्षण द्यावे. मागील आंदोलनात समाजकंटकांनी राडा केला. त्यांच्यावर कारवाई करा. मराठा आंदोलकांवर 307, 354 गुन्हे दाखल केले. हे कदापी मान्य होणार नसल्याचेही विखे म्हणाले.