Thu, Feb 21, 2019 03:02होमपेज › Ahamadnagar › ‘तिथे’ आतापासून मुली नाचणार नाहीत!

‘तिथे’ आतापासून मुली नाचणार नाहीत!

Published On: Mar 10 2018 11:11AM | Last Updated: Mar 10 2018 11:11AMमढीः वार्ताहर

मढी येथे राज्यातील कोल्हाटी समाजाचा प्रबोधन मेळावा संपन्न होऊन बैठकीत मानाचे नारळ फोडण्याचा मान यंदा मानकर्‍या बरोबरच समाजातील महिलांना देण्यात आला. जागतिक  महिला  दिनानिमित्त कोल्हाटी समाजाने समाजातील स्त्रियांचा सन्मान करत येथून पुढे संगीत बारीमधून कोल्हाटी  समाजातील महिला व मुली नाचगाणे करणार नाहीत, असा ठराव प्रबोधन मेळाव्यात  घेण्यात आला. आता नाचायचं नाही शिकायचं, अधिकारी-पदाधिकारी व्हायचं, असा  निर्धार करत नाचगाण्याला मूठमाती  देण्याबाबत सर्वच समाज बांधव आग्रही राहिले.

ज्या महिला या व्यवसायात स्थिरावल्या त्यांना आता पर्याय नाही  पण ज्या नव्याने या व्यवसायात ढकलल्या जातील, नाचगाणे करू इच्छीत असतील त्यांना बंदी घालून शिक्षणासाठी संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. अन्य  समाज इंग्रजी भाषा बोलतात, संगणकावर कामकाज करतात, आम्ही कुठपर्यंत ढोलकी अन् घुंगराच्या तालावर दमायचं अशी  महिलांची भूमिका समाजाला पटली.  समाजातील ज्येष्ठ व तरुण  कार्यकर्त एकत्र आले.

एकमुखी निर्णय होताच सर्वांनी नाथांचा जय जयकार केला. जागतिक महिला दिनी खर्‍या अर्थाने महिलांच्या क्षेत्रात परिवर्तन घडले. पहिल्याच समाज  प्रबोधन मेळाव्याचे  उद्घाटन धुळे नगरपालिकेच्या माजी नगरसेविका संजीवनी प्रकाश जाधव यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले यावेळी अ‍ॅड. अरुण जाधव, राम अंधारे, बाळासाहेब काळे, अरूण मुसळे, नगर महापलिकेचे नगरसेवक सचिन जाधव, जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक अमित जाधव, फुलचंद अंधारे, रवी अंधारे, शरद काळे, विजय काळे, समाधान अंधारे, रवी  बागल, माधुरी काळे, लता जाधव आदी प्रमुखांसह राज्याच्या विविध भागातील कोल्हाटी समाज बांधव यावेळी मोठ्या संख्यने मेळाव्यस उपस्थित होते.