Tue, Apr 23, 2019 08:05होमपेज › Ahamadnagar › फूस लावून मुलीनेच पळविले मुलाला!

फूस लावून मुलीनेच पळविले मुलाला!

Published On: Apr 17 2018 8:56PM | Last Updated: Apr 17 2018 9:08PMश्रीगोंदा : प्रतिनिधी

सतरा वर्षीय अल्पवयीन मुलास फूस लावून पळवून नेऊन, एका मुलीने त्याच्याशी लग्न केल्याचा चित्रपटाच्या कथेला शोभेल असा प्रकार श्रीगोंदा तालुक्यात घडला आहे. एवढेच नाहीतर नातेवाईकांच्या मदतीने या विवाहाची बनावट कागदपत्रे तयार करून या मुलीने शासनाचीही फसवणूक केली.  या प्रकरणी मुलाच्या  पित्याच्या फिर्यादीवरुन मुलीसह इतर सहा जणांविरूद्ध श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लग्नासाठी किंवा एकतर्फी प्रेमातून  मुलींचे अपहरण केल्याच्या अनेक  घटना नेहमीच घडताना दिसतात. मात्र, श्रीगोंदा तालुक्यात चक्क मुलीनेच मुलाला लग्नाच्या आमिषाने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.याप्रकरणी  या मुलीसह तिचे आई-वडील आणि इतर सांविरूद्ध 16 एप्रिलला भा. दं. वि. कलम 363, 420  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत  घटनेबाबत अधिक माहिती अशी की, या अल्पवयीन मुलाशी लग्न लावण्यासाठी मुलीने 19 मार्च रोजी त्याला पळवून आळंदी येथे नेले. तेथे त्या दोघांनी वैदिक पद्धतीने विवाह केला. दरम्यान, दोन्ही कुटुंबीयांच्या नातेवाईकांनी या दोघांचा शोध घेऊन त्यांना श्रीगोंदा पोलिस ठाण्यात आणले. तेथे या दोघांनी आम्ही लग्न केले असून, आम्ही एकत्रच राहणार असल्याचा जबाब पोलिस ठाण्यात नोंदविला. मात्र, मुलाचे वय पूर्ण नसतानाही ही मुलगी व तिच्या नातेवाईकांनी  श्रीगोंदा येथील ग्रामीण  रुग्णालयातून विवाह नोंदणीचा दाखला तयार करून घेतला. 

श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी या अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून तपासाची चक्रे फिरवली आहेत.  हा मुलगा महाविद्यालयात शिक्षण घेत असताना शाळेतील जन्म दाखल्याचा विचार न करता, श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍याने  मुलाचे वय पूर्ण आहे, हा दाखला कसा दिला,  हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे मुलाच्या नातेवाईकांनी बनावट दाखला देणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यालाही आरोपी करण्याची मागणी केली होती.  मात्र, खोटी कागदपत्रे दाखवून आपली दिशाभूल केल्याचे वैद्यकीय अधिकार्‍याने लेखी दिल्याने पोलिसांनी त्याला क्‍लिनचिट देण्याचा प्रयत्न केला आहे. 

तपासानुसार पुढील कारवाई : जाधव

बनावट कागदपत्रांच्या आधारे विवाहाचे प्रमाणपत्र तयार केल्याने शासनाची फसवणूक झाली आहे. त्याचबरोबरच मुलगा अल्पवयीन असल्याने अपहरणाचे कलम लावण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकार्‍याने लेखी दिले आहे. तपासात जे निष्पन्न होईल, त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे, असे तपासी अधिकारी महावीर जाधव यांनी सांगितले.