होमपेज › Ahamadnagar › घुले बंधूंच्या नेवाशात राजकीय हालचाली सुरू

घुले बंधूंच्या नेवाशात राजकीय हालचाली सुरू

Published On: Mar 14 2018 12:53AM | Last Updated: Mar 13 2018 11:24PMकौठा : वार्ताहर

नेवाशात माजी आ. नरेंद्र घुले यांच्या उमेदवारी कार्यकर्त्यांतून मागणी होत आहे. विधानसभा निवडणुकांना बराच अवधी असताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आ. चंद्रशेखर घुले यांनी नेवासा विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचाली सुरू केल्याने माजी आ. शंकरराव गडाख, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे व विद्यमान आ. बाळासाहेब मुरकुटे यांना शह देण्याचा केविलवाणा प्रयत्न होत असल्याची कुजबुज सुरु झाली आहे. त्यामुळे मात्र तालुक्यात राजकीय वातावरण ढवळणार आहे. 

गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीपासून गडाख-घुले संघर्ष जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यात गाजला. अंतर्गत कलाहामुळे गडाखांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली आणि नेवासा मतदार संघात राष्ट्रवादीची वाताहत होण्यास सुरवात झाली. त्याचाच परिणाम म्हणून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत माजी खा.तुकाराम गडाख यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निवडणुकीचे रणशिंग फुकले आहे. नेवाशातून तुकाराम गडाख राष्ट्रवादीचे उमेदवार असतील काय ? अशी चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे. मात्र तालुक्यातील कार्यकर्त्यांनी माजी आ. नरेंद्र घुले यांनी उमेदवारी करावी, अशी मागणी होत असल्याचे ऐकू येत आहे. तुकाराम गडाख यांना पुन्हा राजकारणात सक्रिय करण्याचा प्रयत्न घुलेंकडून होत असल्याने गडाखांच्या नथीतून नेमका कोणाला तीर मारण्याचा प्रयत्न होणार आहे, हे राजकीय गणित घुले यांचे न उलगडणारे कोडे आहे.

मागील अनेक वर्षांपासून गडाख अज्ञातवासात गेले होते. परंतु गेल्या एक-दीड वर्षापासून ते पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येते. पुढील वाटचाली संदर्भात गडाख यांनी कोणतेही व्यक्तव्य केले नसल्याने जिल्हाध्यक्ष घुले यांच्याकडून मात्र राजकीय फटके फोडण्याचा प्रयत्न सुरू आहेत. नेवाशात राष्ट्रवादीकडून गडाख, पांडुरंग अभंग, नरेंद्र घुले की विठ्ठलराव लंघे यापेकी नेमके कोण उमेदवार राहणार, याबद्दल उलट-सुलट चर्चा झडू लागल्या आहेत. 

या सर्व घडामोडीत माजी आ. शंकरराव गडाख यांची काय भूमिका राहणार, यावर नेवाशातील राजकीय गणिते अवलंबून असतील. त्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यातील नेत्यांचे गडाख कुटुंबाच्या हालचालीकडे नजरा लागल्या आहेत.