होमपेज › Ahamadnagar › गिर्‍हे, मोकळेला कोठडी

गिर्‍हे, मोकळेला कोठडी

Published On: Apr 15 2018 1:35AM | Last Updated: Apr 15 2018 12:49AMनगर : प्रतिनिधी

केडगाव येथील सुवर्णनगर परिसरात झालेल्या दुहेरी हत्याकांडातील आरोपी संदीप बाळासाहेब गिर्‍हे व महावीर ऊर्फ पप्पू रमेश मोकळ या दोघांना काल (दि. 14) न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत या दोघांनी आम्ही खून होत असताना घटनास्थळी होतो, पण प्रत्यक्ष खुनात सहभाग नसल्याचा दावा केला आहे. परंतु, खुनानंतर संदीप गुंजाळ याच्यासोबत गिर्‍हे व मोकळ यांचा संवाद झाल्याचे पोलिस चौकशीतून पुढे आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने गिर्‍हे व मोकळ या दोघांना प्रत्यक्ष गुन्ह्यात सहभाग असल्याच्या आरोपावरून शुक्रवारी शिरूर (जि. पुणे) येथून अटक केली आहे. दोघांनाही शनिवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सरकारी पक्षाच्यावतीने बोलताना तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक दिलीप पवार व सरकारी वकील अ‍ॅड. सीमा देशपांडे म्हणाल्या की, यापूर्वी अटक केलेल्या संदीप गुंजाळ याने वसंत ठुबे यांना गिर्‍हे याने गोळ्या घातल्याचे व महावीर मोकळ तेथे असल्याचे सांगितले आहे. गिर्‍हे याचा आणखी एक साथीदार तेथे असल्याचा दावा केला आहे. त्याचा शोध घ्यायचा आहे.

खुनानंतर तिघांचा संवाद झाल्याचे पोलिस तपासातून उघड झालेले आहे. त्यांनी कोठे कट रचला, त्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, फरार आरोपींचा शोध घेणे, गिर्‍हे याचा गावठी कट्टा कोठून खरेदी केला याची माहिती घेणे आहे. विशाल कोतकर याच्यासोबत त्यांनी गुन्ह्याचा कट कोठे रचला, याचा शोध घेणे आहे. आरोपी ज्या वाहनातून घटनास्थळी आले, ते वाहन हस्तगत करायचे आहे. गुन्ह्याचे स्वरुप गंभीर स्वरुपाचे असून, सखोल तपासासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागण केली.
आरोपीच्या वकिलांनी बचावाचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपींना गुरुवारपर्यंत (दि. 19) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. 

Tags :ghire , mokalr costody ,nagar news