Fri, Jul 19, 2019 07:33होमपेज › Ahamadnagar › प्रतीक्षा पहिल्या आवर्तनाची 

प्रतीक्षा पहिल्या आवर्तनाची 

Published On: Jan 04 2018 12:59AM | Last Updated: Jan 03 2018 9:53PM

बुकमार्क करा
गणोरे : वार्ताहर

अकोले तालुक्यातील आढळा धरणाच्या लाभक्षेत्रातील बहुतेक शेतकर्‍यांच्या रब्बीच्या पेरण्या उरकल्या असतानाच अजूनही शेतकरी पहिल्या आवर्तनाच्या प्रतीक्षेतच आहेत. दरम्यान, अगस्ती व थोरात साखर कारखान्यांच्या जेसीबी यंत्राच्या साह्याने कालव्यांमधील गवत व झाडा-झुडपांची सफाई करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. 

धरणाच्या दोन्ही कालव्यांची तसेच चार्‍यांची पुरेशा देखभालीच्या अभावाने दुरवस्था झाल्याचे दिसून येते. पाणीवहन क्षमता घटल्याने कालवे फुटण्याची भीती आहे. मागील वेळेस कालवा फुटल्यामुळे वीरगाव परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय झाला होता. यासाठी वेळीच दक्षता घेणे गरजेचे आहे.

 एक हजार 60 दशलक्ष घनफूट साठवण क्षमतेच्या धरण सांडव्यावरून पाणी वाहिले होते. आढळा नदी पात्रातील व लाभक्षेत्रातील सर्व पाणीसाठे भरल्याने शेतकर्‍यांना आतापर्यंत पाणीटंचाई जाणवली नाही. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आढळा धरणात 986 दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक असून पहिल्या आवर्तनापूर्वीच 74 दशलक्ष घनफूट पाण्याची घट झाली आहे.

लाभक्षेत्रातील बहुतेक शेतकर्‍यांच्या रब्बीच्या पेरण्या उरकल्या आहेत. काही शेतकरी पेरणी करण्याच्या तयारीत असून पहिल्याच आवर्तनाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, अद्यापि जलसंपदा विभागाकडे पुरेशा प्रमाणात पाणी मागणी अर्ज आलेले दिसत नाहीत. आढळा उजवा कालवा 400 हेक्टर, डावा कालवा  200 हेक्टर  क्षेत्रासाठी  कालपर्यंत पाणी मागणी आहे. सर्वांत कमी देवठाणमधून एक, तर वीरगावमधून तीन पाणी मागणी अर्ज आले आहेत. गणोरे गावातून 119 हेक्टर, वडगाव लांडगा 135 हेक्टर, जवळे कडलग 63 हेक्टर, पिंपळगाव निपाणी 40 हेक्टरसाठी पाण्याची मागणी आली आहे. अकोले, संगमनेर व सिन्नर (जिल्हा नाशिक) तालुक्यांच्या   लाभक्षेत्रातील 3 हजार 914 हेक्टर सिंचन क्षेत्र रब्बी हंगामासाठी या पाण्यावर अवलंबून आहे. धरणातील 975 दशलक्ष घनफूट सिंचनासाठी उपयुक्त पाणीसाठा असून, उर्वरित 85 दशलक्ष घनफूट मृत पाणीसाठा आहे. याच पाणीसाठ्यावर लाभक्षेत्रातील पाचगाव पाणीयोजनाही  अवलंबून आहे.