Fri, Apr 26, 2019 17:23होमपेज › Ahamadnagar › सोनसाखळी चोरांची टोळी जेरबंद

सोनसाखळी चोरांची टोळी जेरबंद

Published On: Jul 27 2018 1:24AM | Last Updated: Jul 27 2018 1:24AMसंगमनेर : प्रतिनिधी

संगमनेरच्या विविध भागांतून चोरीस गेलेले 2 लाख 62 हजार 500 रुपये किंमतीचे 9 तोळे सोने चोरीप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने श्रीरामपूर येथून चार अट्टल सोनसाखळी चोरांना जेरबंद केले. दरम्यान, या पकडलेल्या चौघांकडून चोरीचे सोने हस्तगत करण्यात आले.

शहराच्या विविध भागांत महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लांबविण्याच्या घटनेचा तपास सुरू आहे. पोलिसांना गुप्त खबर मिळाल्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर अधीक्षक रोहिदास पवार, उपअधिक्षक अशोक थोरात व पो. नि. अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक पंकज निकम, पो.हे.कॉ. विजय खंडीझोड, पो.ना.बाळासाहेब अहिरे, रमेश लबडे, आशिष आरवडे, पो. कॉ. सागर धुमाळ, गोरक्ष शेरकर, सुभाष बोडखे व अमृत आढाव यांच्या पथकाने श्रीरामपूर शहरातील विविध भागात छापे घालून  अट्टल गुन्हेगारांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या तपासात सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे देणार्‍या या चौघांनी नंतर आपल्या गुन्हेगारी विश्‍वाची एक एक कडी उलगडायला सुरूवात केली. 

या चौघांनी संगमनेरातील प्रतिभा यशवंत करपे यांच्या गळ्यातील पावणे दोन तोळे वजनाचे व 52 हजार 500 रुपये किंमतीचे, आशा राजाराम फापाळे यांच्या गळ्यातील साडेचार तोळे वजनाचे व 1 लाख 35 हजार रुपये किंमतीचे व पद्मा सुनील गुंजाळ यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे आणि 75 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने धूमस्टाईलने पळविल्याची कबुली देत तब्बल नऊ तोळे वजनाचा मुद्देमाल काढून दिला आहे.

या प्रकरणी दाखल तीन फिर्यादीवरून शहर पोलिसांनी आरोपी मुस्लीम यासीन इराणी (वय 24, रा.नवीन कोर्ट समोर, श्रीरामपूर), कंबर रहीम मिर्झा (वय 30,श्रीरामपूर), निसार दादामियाँ शेख (वय 41, गोंधवणी रस्ता, श्रीरामपूर) व अकबर शेरखान पठाण (वय 30, फकिरवाडा रस्ता, श्रीरामपूर) या चौघांना अटक केली आहे. सध्या ते पोलिस कोठडीत आहेत. संगमनेरातील विविध भागांत घडलेल्या सर्व सोनसाखळी चोरीच्या घटनांचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून सुरू असून, या चौघांच्या चौकशीत शहरातील अन्य गुन्हेही उघड होण्याची शक्यता आहे.

अजुनही काही गुन्हे उजेडात येणार : निकम

शहरात धुमस्टाईल गंठण लांबविणारी टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यांनी संगमनेरात केलेल्या तीन घटनांची कबुली दिली आहे. त्यातून 2 लाख 62 हजार 500 रुपयांचे सुमारे नऊ तोळे सोने त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले आहे. दाखल गुन्ह्यातील फिर्यादींना लवकरच त्यांचे दागीने परत केले जातील. सदरचे चारही आरोपी सध्या कोठडीत असून अजूनही काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

पंकज निकम, पोलिस उपनिरीक्षक