होमपेज › Ahamadnagar › दरोडेखोरांची टोळी केली जेरबंद

दरोडेखोरांची टोळी केली जेरबंद

Published On: Sep 01 2018 1:44AM | Last Updated: Aug 31 2018 10:42PMनगर : प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील धोत्रे गावात दरोडा टाकणार्‍या दोघांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले. आरोपींमध्ये सुविकास बिरकुत्या काळे (वय 40 रा. घोडेगाव, ता. जामखेड) व आश्रुबा जालिंदर पवार (वय 35 रा. पिंपळगाव, ता. जामखेड) या दोघांचा समावेश आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, जामखेड तालुक्यातील धोत्रे या गावात दरोडा टाकण्यात आला होता. या गुन्ह्यात पोलिसांना आरोपी आरोपी हवे होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, वरील दरोड्यातील आरोपी हे जामखेड तालुक्यातील घोडेगाव येथे येणार आहेत. त्यानुसार निरीक्षक दिलीप पवार, हेडकॉन्स्टेबल दत्ता हिंगडे, सुनील चव्हाण, रवींद्र कर्डिले, मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, संदीप कचरु पवार, भागिनाथ पंचमुख, विजय ठोंबरे, संदीप बोडके, बबन बेरड आदींच्या पथकाने घोडेगाव येथे धाव घेतली. पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी शिताफीने आरोपींचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.

आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा पाच जणांनी मिळून केल्याचे कबूल केले. धोत्रे शिवारातील जाधव वस्ती येथे घरात घुसून, झोपलेल्या लोकांना मारहाण करून, त्यांच्याकडून बळजबरीने सोन्याचे दागिने व मोबाईल चोरून नेल्याचे आरोपींनी सांगितले. आरोपींना पुढील तपासासाठी जामखेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.