Sun, May 26, 2019 00:45होमपेज › Ahamadnagar › बहिणीच्या कर्जासाठी घेतला मित्राचा जीव

बहिणीच्या कर्जासाठी घेतला मित्राचा जीव

Published On: Jun 30 2018 1:14AM | Last Updated: Jun 29 2018 11:42PMनगर : प्रतिनिधी

बहिणीचे कर्ज फेडण्याकरिता उसने पैसे देण्यास नकार देणार्‍या मित्राचा एकाने निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुरुवारी रात्री उशिरा अरणगाव शिवारात ही घटना घडली. आरोपी अटक केल्यानंतर खुनाच्या कारणाचा उलगडा झाला आहे. मयत व आरोपी केडगावचे रहिवाशी आहेत. आरोपीस पैठण येथून बहिणीच्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे.

राहुल भागवत निमसे (रा. मोहीनीनगर, केडगाव, मूळ रा. अरणगाव) हे मयताचे नाव आहे. अमित बाबुराव खामकर (रा. क्रांती चौक, सुतारगल्ली, केडगाव) हे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी खामकर व मयत निमसे हे दोघे व्हीआरडीई येथे सफाई कामगार म्हणून नोकरी करतात. दोघांची मैत्री होती. आरोपी खामकर याची बहीण पूर्वी तिच्या मावससासूकडे नगर तालुक्यातील एका गावी राहत होती. त्यावेळी त्याच्या बहिणीने मावससासूकडून पैसे घेतले होते. ते पैसे परत न दिल्याने मावससासूने खामकर याच्या बहिणीची भांडी स्वतःकडे गहाण म्हणून ठेवून घेतली होती. अमित याचे बहिणीवर खूप प्रेम होते. त्या पे्रमापोटी अमित याने बहिणीची भांडी सोडवून घेण्यासाठी पैशाची जमवाजमव करण्याचे ठरविले.

त्याच्यासाठी त्याने एक शक्कल लढविली. त्याच्यासोबत काम करणार्‍या राहुल निमसे याच्या बँक खात्यावर नोकरीचा किती पगार जमा होतो, हे विचारण्याचा बहाणा करून त्याच्या एटीएमचा पासवर्ड विचारून घेतला. राहुल यांनीही विश्‍वासाने पासवर्ड सांगितला. त्याने राहुल यांच्या खात्यावर बॅलन्स चेक केला असताना 1 लाख 20 हजार होते. परंतु, आकडे पाहण्याच्या घोळात त्याला वाटते खात्यावर 12 लाख रुपये आहेत. त्या पैशाच्या लालसेपोटी काही दिवसांपासून अमित खामकर हा मित्र राहुल यांच्याकडे उसने पैसे मागत होता. मात्र, माझ्याकडे जास्त रक्कम नाही, असे सांगून पैसे देण्यास नका दिला जात होता. काही दिवसांपासून त्यांच्यात यावरून वाद सुरू होते.

गुरुवारी (दि. 28) रात्री पावणेनऊ वाजता अमित याने मित्र राहुल यांना फोन करून बोलावून घेतले. मित्राने बोलाविल्यामुळे तो विश्‍वासाने गेला. दोघेही अरणगाव शिवारात मुथा याच्या प्लॉटजवळ जमले. तेथे एका ठिकाणी दोघांची पार्टी झाली. पार्टी आटोपल्यावर अमित याने बेडशीटने राहुल यांचे तोंड दाबले. त्यानंतर डोक्यात दगड घातला. अतिरक्तस्त्रावाने राहुल यांचा मृत्यू झाला. त्यांचे एटीएम कार्ड घेऊन अमित हा पसार झाला. त्याने हा प्रकार त्याचा भाऊ गणेश खामकर याला सांगितला. त्यानंतर तो पसार झाला. आरोपी खामकर याच्या भावाने कोतवाली पोलिस ठाण्यात फोन करून खुनाची माहिती दिली. परंतु, ही घटना नगर तालुका पोलिसांच्या हद्दीत असल्याचे समजल्याने त्यांना कळविण्यात आले. नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्यासह पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. 

घटनास्थळावरून पसार झालेल्या अमित याने केडगाव परिसरातील एका एटीएम मशीनवरून राहुल निमसे यांच्या खात्यावरून 40 हजार रुपयांची रोख रक्कम काढली. तेथून तो पैठण येथे बहिणीचा पैसे देण्यासाठी निघाला. एका दिवसाची पैसे काढण्याची क्षमता संपल्याने उर्वरीत रक्कम तो पुन्हा एटीएमद्वारे काढून बहिणीला देऊन तिचे कर्ज फेडणार होता. पोलिसांना आरोपी खामकर हा खुनानंतर पैठणला गेल्याचे समजले. त्यावरून सहाय्यक निरीक्षक परदेशी यांच्या मार्गर्शनाखाली पोलिस कर्मचारी आनंद सत्रे, विनोद पवार, शाबीर शेख, संदीप जाधव आदींच्या पथकाने सापळा लावून अमित खामकर याला पकडले. नगरला आणून सायंकाळी आरोपीच्या अटकेची कार्यवाही पूर्ण करण्यात आली. बहिणीचे कर्ज फेडण्यासाठी मित्राचा जीव घेणारा अमित खामकर हा काही तासांतच पोलिसांच्या हाती लागला. 

याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात राजू भागवत निमसे यांच्या फिर्यादीवरून अमित बाबुराव खामकर याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला शनिवारी (दि. 30) न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी हे करीत आहेत.