Mon, Mar 25, 2019 13:14होमपेज › Ahamadnagar › गुंतवणूकदारांना 23 कोटींचा चुना

गुंतवणूकदारांना 23 कोटींचा चुना

Published On: Apr 21 2018 12:58AM | Last Updated: Apr 20 2018 11:38PMनगर : प्रतिनिधी

आर. डी. व एफ. डी.मध्ये गुंतवणूक केल्यास चांगले व्याज मिळण्याचे आमिष दाखवून जिल्ह्यातल्या 26 हजार गुंतवणूकदारांना मैत्रेय ग्रुप कंपनीने तब्बल 23 कोटींना चुना लावला आहे. याबाबत मैत्रेय ग्रुपच्या अध्यक्षासह चौघांवर फसवणुकीचा गुन्हा तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. गुंतवणूक केलेले पैसे परत मिळत नसल्याने गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.कंपनीचे नगर जिल्ह्यातील एजंट सतीश पुंडलिक पाटील (रा. रुई,ता. राहाता) यांनी फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये ग्रुपच्या अध्यक्ष वर्षा मधुसूदन सत्पाळकर  (रा. वसई रोड, जिल्हा ठाणे), संचालक विजय तावरे, लक्ष्मीकांत नार्वेकर, जनार्दन परुळेकर आदींचा समावेश आहे.फिर्यादीत म्हटले आहे केली, फेब्रुवारी 2016 पासून मैत्रेय ग्रुपच्या अध्यक्षांसह वरील आरोपींनी गुंतवणुकीची योजना सुरु केली. एजंट सतीश पाटील यांच्यामार्फत गुंतवणुकीच्या योजनांमध्ये जिल्ह्यातील 26 हजार गुंतवणूकदार सहभागी झाले. त्यांचा विश्वास संपादन करून या गुंतवणूकदारांकडून आर. डी. व एफ. डी.च्या स्वरूपात पैशांची गुंतवणूक घेण्यात आली.

गुंतवणूक दारांनी कंपनीकडे पैशांची मागणी केली असता अनेकांना न वटणारे चेक देण्यात आले. 26 हजार गुंतवणूक दारांच्या गुंतवणुकीचा आकडा हा 23 कोटींवर गेला आहे. वारंवार मागणी करूनही गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा देण्यात आलेला नाही. गुंतवणूकदारांनी एजंटकडे पैशांची मागणी केली. मात्र कंपनी पैसे देत नसल्याने एजंटने कंपनीच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल केला आहे. मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याने गुन्हाच तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकांकडे सोपविण्यात आला आहे.

Tags : Ahmadnagar, fraud,  23, crores,  investors