Sun, Jul 21, 2019 10:15होमपेज › Ahamadnagar › माजी मंत्री पाचपुते भीषण अपघातातून बचावले

माजी मंत्री पाचपुते भीषण अपघातातून बचावले

Published On: Jul 01 2018 1:51AM | Last Updated: Jul 01 2018 1:51AMश्रीगोंदा/काष्टी : प्रतिनिधी 

माजी मंत्री बबनराव पाचपुते हे नगर-पुणे महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात बालंबाल बचावले. शुक्रवारी (दि.29) रात्री दहाच्या सुमारास त्यांच्या वाहनाला सरदवाडी शिवारात अपघात झाला. या अपघातात पाचपुते यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले असलेतरी, सुदैवाने एअरबॅगेमुळे त्यांना कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही.  

याबाबत अधिक माहिती अशी की, नगर शहरासह तालुक्यात काल अनेक  कार्यक्रमांना हजेरी लावून माजी मंत्री पाचपुते हे त्यांच्या वाहनाने (क्र.एमएच16 -बीएम 555) चालक युवराज उबाळे व स्वीय्य साहाय्यक योगेश भोसले यांच्यासमवेत नगर-पुणे महामार्गावरून पुण्याच्या दिशेने जात होते. सरदवाडी शिवारात रस्त्यावरच उभ्या असलेल्या मध्यप्रदेश येथील मालट्रकला (क्र.एमपी09-0864) पाठीमागून जोराची धडक बसली. ही धडक एवढी जोरात होती की पाचपुते यांच्या वाहनाचे इंजिन काही अंतर मागे आले. मात्र, या तिघांनीही सीटबेल्अ लावलेला असल्याने धडक बसताच आतील एअर बॅगा उघडल्या गेल्या. या बॅगांमध्ये पाचपुते यांच्यासह तिघेजण सुरक्षित राहिले. त्यांना कुठलीही इजा झाली नाही. चालक उबाळे व सरदवाडी येथील शरद पाचारणे यांनी  सर्वांना बाहेर काढून बाजूला बसविले.

पाचपुते यांच्या वाहनाला अपघात झाल्याचे समजताच शिरूर, दैवदैठण भागातील कार्यकर्ते सतीश धावडे, सचिन कातोरे, रायचंद वाखारे, निवृत्ती वाखारे, जयंत वाखारे यांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली. सतीश धावडे यांनी आपल्या वाहनातून सर्वांना पुणे येथे सुखरुप सोडले. पुण्याला त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. पाचपुते यांच्या अपघाताचे वृत्त सोशल मीडियावरुन तालुक्यात वार्‍यासारखे पसरले. 

सर्वांच्या कृपेने विघ्न टळले :  पाचपुते 

या अपघाताबाबत बोलताना माजी मंत्री बबनराव पाचपुते म्हणाले, तालुक्यातील जनतेचे प्रेम बरोबर व पंढरीच्या पांडुरंगाचे आशीर्वाद बरोबर असल्यानेच एवढा मोठा अपघात होऊनही साधे खरचटलेही नाही. सर्वांच्या कृपेने आलेले विघ्न टळले. वाहनातून प्रवास करताना सीट बेल्ट किती महत्त्वाचा आहे, याचा अनुभव मला आला. त्यामुळे वाहन चालवताना आणि वाहनात बसताना प्रत्येकाने सीट बेल्ट लावणे गरजेचे आहे.
     ‘माझ्या देवाक काळजी रे..!’

अपघाताबाबत चालक उबाळे यांनी सांगितले की, गाडी ओव्हरटेक केल्यानंतर अचानक समोर बंद पडलेला ट्रक दिसला. उजवीकडे रस्ता दुभाजक असल्याने गाडी डावीकडे वळविण्याचा प्रयत्न केला. पण डावीकडेही वाहनांची रांग असल्याने गाडी पूर्णपणे डावीकडे नेणे अशक्य होते. बंद पडलेल्या अवस्थेत समोर उभा असलेला आणि अचानक दिसलेला ट्रक म्हणजे आता मृत्यूच समोर होता. मात्र, विचार करायला देखील वेळ नव्हता. गाडी ट्रकवर जाऊन आदळली. पण, सुदैवाने आम्ही लावलेल्या सीट बेल्टमुळे एअर बॅग्स उघडल्या अन् भीषण अपघात होऊनही दैव बलवत्तर म्हणूनच आम्ही बचावलो.