Fri, Aug 23, 2019 15:18होमपेज › Ahamadnagar › सतरा प्रभागांची प्रारुप रचना तयार!

सतरा प्रभागांची प्रारुप रचना तयार!

Published On: Aug 08 2018 1:47AM | Last Updated: Aug 08 2018 1:47AMनगर : प्रतिनिधी

डिसेंबर महिन्यात होणार्‍या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाकडून 17 प्रभागांच्या प्रारुप रचनेचा प्रस्ताव तयार केला आहे. महापालिकेच्या सदस्य संख्येत कुठलाही बदल झाला नसून, प्रत्येक प्रभागात 4 सदस्य असे एकूण 68 नगरसेवक व प्रत्येक प्रभागात सरासरी 20 हजार लोकसंख्या यानुसार रचनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रारुप प्रस्ताव तपासणीसाठी विभागीय आयुक्‍तांकडे सादर करण्यात आला असल्याची माहिती प्रभारी आयुक्‍त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली आहे.

निवडणूक आयोगाने 27 जुलै रोजी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करुन, 7 ऑगस्टपर्यंत अनुसूचित जाती व जमातीच्या आरक्षणासह प्रभाग रचना तयार करण्याचे व प्रारुप प्रस्ताव तपासणीसाठी विभागीय आयुक्‍तांकडे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार काल मनपाकडून प्रारुप प्रस्ताव विभागीय आयुक्‍तांकडे सादर करण्यात आला आहे. यात 2011 च्या जनगणनेनुसार व मनपा अधिनियमातील तरतुदींनुसार 68 सदस्यांची संख्या निश्‍चित करण्यात आली आहे. तसेच एका प्रभागात 4 सदस्य या नुसार 17 प्रभाग तयार करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या सूत्रानुसार प्रत्येक प्रभागात सरासरी 20 हजार 938 इतकी लोकसंख्या राहणार असून, आवश्यकतेनुसार यात 10 टक्के कमी अथवा जास्त असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. जनगणनेनुसार प्रभागातील अनुसूचित जाती व जमातीची लोकसंख्या विचारात घेवून आरक्षण निश्‍चित करण्यात आले आहे.

मनपा आयुक्‍त व जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या तपासणीनंतर प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव विभागीय आयुक्‍तांकडे सादर करण्यात आला आहे. विभागीय आयुक्‍तांच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे सादर केला जाणार आहे. 18 ऑगस्टपर्यंत आयोगाकडून याला मान्यता मिळणार असून त्यानंतर 24 ऑगस्टला नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला राखीव जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्यानंतर 27 ऑगस्ट रोजी आरक्षणासह प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव सर्वांसाठी खुला केला जाणार आहे. अनुसूचित जाती व जमातीसाठी किती व कोणते प्रभाग निश्‍चित झाले आहेत, याची माहितीही याच दिवशी मिळणार असल्याने प्रभाग रचनेबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

तोडफोडीच्या भीतीमुळे नगरसेवकांचे धाबे दणाणले!

प्रभाग रचनेबाबत इच्छुकांसह राजकीय वर्तुळातून अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. कोणते प्रभाग एकत्र येणार, कोणता भाग वगळणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे. जळगाव व सांगली महापालिकेची प्रभाग रचना करतांना अनेक प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात जुन्या प्रभागांची ‘तोडफोड’ झालेली आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘तोडफोडी’च्या भीतीमुळे विद्यमान नगरसेवकांचे धाबे दणाणले आहेत. नव्याने निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेल्या इच्छुकांनीही देव पाण्यात घातल्याचे चित्र आहे.