होमपेज › Ahamadnagar › फोर्ड’चे अध्यक्ष वितरकाविरुद्ध गुन्हा

फोर्ड’चे अध्यक्ष वितरकाविरुद्ध गुन्हा

Published On: Mar 05 2018 1:40AM | Last Updated: Mar 05 2018 12:13AMनगर : प्रतिनिधी

फोर्ड कंपनी व वितरकाने फसवणूक केल्याप्रकरणी भाजपाचे खा. दिलीप गांधी यांनी रविवारी सायंकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून फोर्ड इंडिया कंपनीचे अध्यक्ष, वितरक व कर्मचार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये फोर्ड इंडिया प्रा. लि. चे अध्यक्ष अनुराग मेहरोत्रा (मुख्यालय- मराईमलाईनगर, चेन्नई, तामिळनाडू), सालसर व्हिल्स प्रा. लि. चे मालक भूषण गोवर्धन बिहाणी, गोवर्धन मोतीलाल बिहाणी, अभिषेक गोवर्धन बिहाणी, कर्मचारी सुशील ओसवाल, अजय रसाळ (सर्व रा. नगर) यांचा समावेश आहे. 

याबाबत खा. गांधी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, खा. गांधी व त्यांचा मुलगा सुवेंद्र गांधी हे 24 डिसेंबर 2014 रोजी सालसर व्हिल्स येथे फोर्ड कंपनीची गाडी घेण्यासाठी गेले होते. त्यांना शोरुम मालक व कर्मचार्‍यांनी 24,87,750 रुपये किंमतीचे मॉडेल दाखविले. ती गाडी पसंत पडल्याने खा. गांधी यांनी एक लाख रुपयांचा धनादेश दिला व उर्वरित रकमेपैकी 20 लाख रुपये युनियन बँकेच्या चितळे रस्ता शाखेतील वाहन कर्जातून दिले. तसेच 3 लाख 87 हजार 750 रुपये रोख स्वरुपात दिले. आरटीओकडे नोंदणीची प्रक्रिया 30 मार्च 2015 रोजी पूर्ण करून मिळाली. त्यावर निर्मिती वर्ष म्हणून सन 2015 नमूद केले होते. 

गाडीचा वापर सुरू केल्यानंतर गाडी नवीन वाटली नाही. सतत बिघाड होऊ लागल्याने गाडी चांगल्या शोरुममध्ये दाखविण्याचा निर्णय घेतला. सर्व्हिसिंग व दुरुस्तीसाठी गाडी वाघोली (पुणे) येथील तलेरा फोर्ड शोरुममध्ये नेण्यात आली. सर्व्हिसिंग करणार्‍या कामगाराशी गाडीचालकाने चर्चा केली असता, चर्चेतून ही गाडी सन 2012 ची असल्याचे समजले. गाडी जुनी असल्याचे लक्षात आल्यानंतर माहिती घेतली असता गाडीचा मालकी हक्क, नोंदणीबाबत तफावत असल्याचे निदर्शनास आले. त्याबाबत गाडी खरेदी केलेल्या सालसर फोर्ड शोरुमकडे वारंवार चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. 

खा. गांधी यांनी याबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व इतर शासकीय कार्यालयांकडे चौकशी केली असता, कंपनी व वितरकाने जुने वाहन आर्थिक फायद्याकरिता नवीन असल्याचे दाखवून विक्री केले. तसेच खोटी कागदपत्रे तयार करून खोटी नोंदणी केल्याचे स्पष्ट झाले. आरटीओ टॅक्सपोटी 2,71,333  रुपयांची रक्कम उकळल्याचेही लक्षात आले. त्यावरून फोर्ड इंडिया कंपनीचे अध्यक्ष, मेहरोत्रा, वितरक बिहाणी व कामगारांविरुद्ध कट रचून फसवणूक, अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास स. पो. निरीक्षक विनोद चव्हाण हे करीत आहेत.