Tue, Mar 26, 2019 23:55होमपेज › Ahamadnagar › जामखेडमध्ये दोघांवर गोळीबार

जामखेडमध्ये दोघांवर गोळीबार

Published On: Feb 02 2018 1:33AM | Last Updated: Feb 01 2018 10:54PMजामखेड : प्रतिनिधी

ग्रामपंचायत निवडणुकीतील पराभवाच्या रागातून दोघांवर गोळीबार करण्याची घटना काल (दि.1) दुपारी बाराच्या सुमारास जामखेड येथे पंचायत समितीसमोर घडली. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या या दोघांंना उपचारार्थ नगरला हलविण्यात आले आहे. तर एका जखमीच्या वडिलांना नाळवंडी (ता. पाटोदा, जि. बीड) येथे मारहाण करण्यात आली आहे. दोन्ही प्रकारांबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल झालेला नव्हता.

डॉ. सादीक जानुलाल पठाण व कय्युम सुलेमान शेख अशी गोळीबारात जखमी झालेल्यांची नावे आहेत. तर जानुलाल महमंद पठाण असे मारहाण झालेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नाळवंडी (ता.पाटोदा जि. बीड) ग्रामपंचायतीची नोव्हेंबर 2017 ला निवडणूक झाली. या निवडणुकीत पठाण गटाचे सरपंचासह चार सदस्य निवडून आले. तर विरोधी गटाचे पाच सदस्य निवडून आले. जनतेतून आपला सरपंच निवडून न आल्याने विरोधी गटाकडून पठाण कुटुंबातील लोकांना धमकी देणे सुरू होते. यातूनच सरपंचाचे पती यशवंत पन्हाळकर यांना 8 जानेवारी 2018 रोजी पाटोदा तहसील कार्यालयासमोर मारहाण करण्यात आली होती. त्याच्या निषेधार्थ पाटोदा येथे उपोषणही करण्यात आले होते. 

या वादाचे पडसाद काल (दि.1)  पुन्हा उमटले. सकाळी 11 च्या सुमारास नाळवंडी येथे जानुलाल महंमद पठाण (वय 55) यांना जबर मारहाण करण्यात आली. यामध्ये त्यांच्या हात व पायांना गंभीर दुखापत झाली. आपल्या वडिलांना मारहाण करण्यात आल्याची माहिती कळताच डॉ. सादीक जानुलाल पठाण हे कय्युम सुलेमान शेख यांच्यासह नाळवंडीकडे निघाले होते. मात्र, हल्लेखोर त्यांना मारण्यासाठी जामखेडला येत असल्याचा फोन त्यांना आला. त्यामुळे डॉ. सादीक पठाण हे सहकर्‍यासह दुपारी  12 वाजता जामखेड शहरातील नगर रस्त्यावरून मारूती कारने (क्र.एमएच23-ई 4289) जात होते. त्याचवेळी पंचायत समितीसमोर पांढर्‍या रंगाच्या स्कॉर्पिओतून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी मारूती कारला आडवे होत काचा फोडल्या. त्यानंतर कारमधील डॉ. सादीक पठाण यांच्यावर दोन तर कय्युम सुलेमान शेख याच्यांवर एक गोळी झाडली. 

त्यांना जखमी अवस्थेत जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, गंभीर जखमी असल्याने या दोघांना नगर येथे हलविण्यात आले आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, एवढी मोठी घटना घडूनही काल रात्री उशिरापर्यंत जामखड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. तसेच मारहाणीबाबत अंमळनेर (ता.पाटोदा) पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल झालेला नव्हता. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचा पंचनामा करताना जाामखेड पोलिसांना एक जीवंत काडतुस व  गोळ्या झाडलेल्या चार पुंगळ्या आढळून आल्या आहेत. आरोपींच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना झाली आहेत. जामखेड शहरात तणावपूर्ण शांतता असून, पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.