Tue, Jul 16, 2019 21:50होमपेज › Ahamadnagar › शिल्पकार कांबळे यांचा स्टुडिओ भस्मसात

शिल्पकार कांबळे यांचा स्टुडिओ भस्मसात

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

येथील शिल्पकार प्रमोद कांबळे यांचा भिस्तबाग रस्त्यावरील स्टुडिओ रविवारी दुपारी आगीत भस्मसात झाला. यात सुमारे एक कोटी रुपयांच्या आसपास नुकसान झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. यात अनेक मौल्यवान वस्तू, शिल्पांचाही समावेश आहे. स्टुडिओच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेतील कचरा पेटविल्यामुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

रविवारी दुपारी शिल्पकार कांबळे यांच्या स्टुडिओच्या पाठीमागील मोकळ्या जागेतील कचरा कोणीतरी पेटवून दिला. ही आग सुरुवातीला विझविण्यात आली होती. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने थोड्या वेळाने आग पुन्हा भडकली. अडीच वाजण्याच्या सुमारास कांबळे यांचा स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. उन्हाची तीव्रता, गॅस वेल्डिंगच्या टाक्या, रंगासाठी असलेले वेगवेगळे केमिकल्स यामुळे स्टुडिओत आगीचा भडका उडाला. शिल्पांनीही पेेट घेतल्याने आगीची तीव्रता वाढली. घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलास देण्यात आली. परंतु, अर्धा तास उलटूनही गाड्या पोहोचू शकल्या नाहीत. एमआयडीसी अग्निशमन दलाची गाडी सुरुवातीला पोहोचली. त्यांनी आग विझविण्यास सुरुवात केली. त्यानंतर मनपा अग्निशमन दलाच्या इतर गाड्याही दाखल झाल्या. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला.

आगीची माहिती मिळताच तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेश सपकाळे यांच्यासह पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. दीड तासानंतर आग नियंत्रणात आणली. अग्निशमन दलाच्या तब्बल 14 बंबांनी आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. आ. संग्राम जगताप, माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रासह अनेक मान्यवर घटनास्थळी दाखल झाले होते. महापालिका अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाल्याने आ. संग्राम जगताप यांनी अग्निशमन दलातील अधिकार्‍यांची चांगलीच खरडपट्टी काढल्याचे समजते.

Tags : fire, Craftsman, pramod kambale, studio, nagar, nagar news  


  •