Sun, Aug 25, 2019 08:56होमपेज › Ahamadnagar › ‘त्या’ फायली ठेकेदारांनी पळविल्या!

‘त्या’ फायली ठेकेदारांनी पळविल्या!

Published On: May 12 2018 1:23AM | Last Updated: May 11 2018 11:51PMनगर : प्रतिनिधी

उद्यान विभागाकडून सादर करण्यात आलेल्या 47.50 लाखांच्या ‘किरकोळ’ देयकांसह 8 लाख रुपयांच्या बुके खरेदीला प्रशासकीय मान्यता न घेताच काम करुन देयके तयार करण्यात आल्या प्रकरणी उद्यान विभाग प्रमुखांना आयुक्‍तांनी नोटीस बजावली आहे. दरम्यान, या देयकांच्या फायलीही मनपातून गहाळ झाल्या असून ठेकेदार या फायली घेवून गेल्याचे उद्यान विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या बिलांबाबत व त्यातील कामांबाबत संशय बळावला आहे.

शहरातील मोकळ्या भूखंडाची साफसफाई करणे, झाडे लावण्यासाठी खड्डे घेणे आदी कामांसाठी जेसीबी भाडेतत्वावर घेण्यात आला होता. त्याच्या भाड्यापोटी सरासरी 70 तासांची देयके तयार करण्यात आली आहे. तसेच गवत काढण्याच्या कामांचीही देयके तयार करण्यात आली असून तब्बल 47.50 लाखांची ही कामे असल्याचे पुढे आले आहे. या सर्व कामांचे प्रस्ताव विभाग प्रमुखांनीच त्यांच्या अधिकारात मंजूर करण्यासाठी किरकोळ बिले तयार करण्यात आली आहे. मुख्य लेखापरीक्षकांकडे यातील 22.47 लाखांची देयके मंजुरीसाठी सादर झाल्यानंतर ‘पुढारी’ याबाबत वृत्त प्रसिध्द केले होते. आयुक्‍तांनी याची गंभीर दखल घेत लेखा परीक्षकांच्या आक्षेपानुसार उद्यान विभागप्रमुखांना नोटीस बजावून खुलासा मागविला आहे. तसेच या सर्व बिलांची चौकशी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. मनपाकडे जेसीबीसाठी वार्षिक निविदा मंजूर असतांना व स्वतंत्र काम करायचे असेल लाखो रुपयांची कामे प्रस्तावित असतांना वरीष्ठ अधिकार्‍यांची मंजुरी घेणे आवश्यक व क्रमप्राप्त होते.

त्यामुळे एका कामाची ‘किरकोळ’ बिले तयार करण्यामागे ‘हेतू’ काय? असा सवाल ‘पुढारी’ने उपस्थित केला होता. त्यानंतर माजी सभागृह नेते अनिल शिंदे यांनीही आयुक्‍तांना पत्र देवून कामांबाबत खात्री करण्याची मागणी केली होती. प्रशासनाकडून याची दखल घेण्यात आल्यानंतर संबंधित ठेकेदारांमध्ये खळबळ उडाली असून त्यांनी प्रस्ताव व देयकांच्या फायली मनपातून पळविल्या आहेत. याबाबत उद्यान विभागाकडे विचारणा केली असता, त्यांनीही ठेकेदार फायली घेवून गेल्याचे स्पष्ट केले आहे. आधीच संशयाच्या भोवर्‍यात असलेल्या या बिलांच्या फायली पळविण्यात आल्यामुळे यात बोगस बिलांचा समावेश असल्याची चर्चा मनपा वर्तुळात रंगली आहे.