Wed, Mar 27, 2019 01:56होमपेज › Ahamadnagar › पंधरा ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा गाजणार

पंधरा ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा गाजणार

Published On: Aug 13 2018 1:17AM | Last Updated: Aug 12 2018 11:16PMराहुरी : रियाज देशमुख

तालुक्यातील मुळा व प्रवरा नदीपात्रांतील वाळूसाठ्यांचे लिलाव करण्यासाठी महसूल प्रशासनाकडून ग्रामस्थांच्या ना हरकती घेण्यासाठी ग्रामसभा घेण्यात येत आहेत. एकूण 28 ग्रामपंचायतींपैकी 13 ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा घेण्यात आल्या असून केवळ 3 ग्रामपंचायतींनी वाळू लिलावास संमती दर्शविली आहे. उर्वरित 15 ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा चांगल्याच गाजण्याची शक्यता आहे.

तालुक्यातील मुळा व प्रवरा नदीपात्रांमध्ये वाळू तस्करांचा धुडगूस पाहता महसूल प्रशासनापुढे वाळू चोरी रोखण्याचे मोठे आव्हान आहे. मुळा व प्रवरा नदीपात्रांमध्ये वाळूतस्करांनी आपले बस्तान निर्माण केेले आहे. सर्वसामान्यांसह प्रशासनालाही पायदळी घेत मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरूच असतो. यामुळे वाळूतस्करी रोखण्यासाठी सरकारने नुकतेच वाळू लिलाव व्हावेत, म्हणून लिलावाच्या रकमेतून संबंधित गावाला ग्रामविकास निधी देण्याचा निर्णय घेतला. वाळूचोरी करताना वाहन आढळल्या दंडात्मक रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ केली. परंतु वाळू चोरी रोखली जात नसून मोठ्या प्रमाणात नदीपात्रात वाळू उपसा करून नदीपात्राचे लचके तोडलेच जात आहेत. यामुळे राहुरी महसूल विभागाने मुळा व प्रवरा नदीपात्रांतील 28 गावांशी संलग्न असलेल्या गावांची ग्रामसभा घेत वाळू लिलावासाठी ग्रीन सिग्नल मिळविण्यासाठी ग्रामसभांचे नियोजन सुरू केले आहे. 

पहिल्या टप्प्यात 13 गावांची ग्रामसभा घेण्यात आली. यात राहुरी खुर्द, अंमळनेर, चिखलठाण या ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेत वाळू लिलाव करण्याबाबत होकार दर्शविण्यात आला आहे. देसवंडी, आंबी, गंगापूर, कोपरे, वांजूळपोई, म्हैसगाव, केंदळ खुर्द, मानोरी, कोल्हार खुर्द, रामपूर या ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेत महसूल प्रशासनाला वाळू लिलाव करण्यास हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. याप्रमाणे पहिल्या टप्प्यातील 10 ग्रामपंचायतींनी नकार दर्शविल्याने महसूल विभागापुढे पेच निर्माण झाला आहे. 

दि. 13 व 14 ऑगस्ट रोजी तांदूळवाडी, आरडगाव, केसापूर, ब्राह्मणगाव भांड, सात्रळ, धानोरे, तिळापूर, मांजरी, दरडगाव थडी, पिंप्री वळण-चंडकापूर, वळण, सोनगाव, कोंढवड, पाथरे, चिंचोली या गावांच्या ग्रामसभा होणार आहेत.  याप्रमाणे वाळू लिलावाची सर्व भिस्त ग्रामसभांवर अवलंबून असल्याने 13 पैकी केवळ 3 ग्रामपंचायतींचा वाळू लिलावास होकार प्राप्‍त केलेल्या राहुरी महसूल प्रशासनापुढे मोठा पेच आहे. एकीकडे जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार वाळू लिलावाच्या माध्यमातून सरकारी तिजोरीत महसूल जमा करण्याचे आव्हान  असताना वाळू लिलावास होणारा विरोध पाहता महसूल विभागाचे वसुली नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. 

राहुरी विभागाला गौण खनिजातून 9 कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट्य असून, वाळू लिलावातूनच सदरची रक्कम वसुली व्हावी, म्हणून वाळू लिलाव होणे गरजेचे आहे. परंतु बहुतेक गावांतील ग्रामस्थांचे वाळू लिलावास नकार घंटा येत असल्याने महसूल विभागाला 9 कोटी वसुलीसाठी ग्रामस्थांचा वाळू लिलावासाठी होकार मिळविणे गरजेचे बनले आहे. याबाबत महसूल विभागाशी संपर्क साधला असता गेल्या वर्षभरापासून सरकारच्या नवीन अध्यादेशानुसार वाळू लिलावाच्या रकमेतून ग्रामनिधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 कोटीपर्यंत वाळू लिलाव झाल्यास लिलाव रकमेच्या 25 टक्के रक्कम ग्रामनिधीमध्ये वर्ग केली जात आहे.1 ते 2 कोटींपर्यंत वाळू लिलाव झाल्यास संबंधित ग्रामपंचायतीला लिलाव रकमेपैकी 20 टक्के किंवा 25 लाख रुपये निधी, 2 कोटी ते 5 कोटींपर्यंत लिलाव झाल्यास 15 टक्के किंवा 40 लाख रुपये ग्रामनिधी उपलब्ध होणार आहे. 5 कोटींपेक्षा अधिक रकमेचा वाळू लिलाव झाल्यास 60 लाख किंवा लिलावाच्या रकमेपैकी 10 टक्के रक्कम ग्रामनिधी म्हणून दिली जात आहे. दरम्यान, बारागाव नांदूर, जातप व करजगाव येथील मुळा व प्रवरा नदी पात्रातील वाळूसाठ्यांचे लिलाव झाले होते. मात्र, ते मुदतीपूर्वीच बंद पडल्याने नवीन लिलाव घेण्याबाबत ठेकेदारही सावध आहेत.   

ग्रामस्थांनी सहकार्य करावे : तहसीलदार दौंडे 

मुळा व प्रवरा नदीपात्रांतील लिलावासाठी 28 गावांच्या ग्रामसभा घेतल्या जात आहेत. लिलावाच्या रकमेतून ग्रामविकासासाठी निधी उपलब्ध होणार आहे. लिलाव न झाल्यास वाळू चोरी होऊन गावासह सरकारचे नुकसान होणार आहे. वाळू चोरी रोखण्यासाठी लिलाव होणे गरजेचे आहे. संबंधित गावांनी ग्रामसभेत वाळू लिलावास होकार दर्शविण्याचे आवाहन तहसीलदार अनिल दौंडे यांनी केले आहे.