Thu, Mar 21, 2019 11:16होमपेज › Ahamadnagar › शेतकर्‍याचा आत्मदहनाचा प्रयत्न

शेतकर्‍याचा आत्मदहनाचा प्रयत्न

Published On: Mar 23 2018 1:56AM | Last Updated: Mar 22 2018 10:50PMनगर : प्रतिनिधी

गेल्या सहा वर्षांपासून पैसे भरूनही वीजजोडणी मिळत नसल्याने, वैतागलेल्या शेतकर्‍याने जिल्हाधिकारी कचेरीसमोर आत्मदहनाचा प्रयत्न करताच, पोलिस कर्मचारी व प्रेस क्लबच्या अध्यक्षांसह पत्रकारांनी शेतकर्‍याला अडवल्याने पुढील अनर्थ टळला.  

नगर तालुक्यातील रांजणी येथील सखाराम लक्ष्मण ठोंबे यांनी  कृषिपंपांसाठी वीजजोडणी  मिळावी, यासाठी 10 मार्च 2012 रोजी महावितरणकडे पैसे भरून कोटेशन घेतले होते. महावितरणकडून त्यांना रितसर वीजजोडणी मिळाली, परंतु शेजारील शेतकरी वीजखांब रोवण्यासाठी अडथळा आणत असून, त्यांनी रस्तादेखील अडविला असल्याचा आरोप  ठोंबे यांनी केला. या शेतकर्‍यांनी  विहिरीचे काम बंद पाडून, त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे.  या सर्व गोष्टीला सखाराम ठोंबे वैतागून गेले आहेत. 

त्यामुळे वैतागलेल्या ठोंबे यांनी काल (दि.22) थेट जिल्हाधिकारी कार्यालयच गाठले. शेजारील शेतकर्‍यांच्या जाचाची दखल घेऊन, शासनाने कृषिपंपाला वीजजोडणी मिळवून द्यावी, अशी मागणी करत त्यांनी सकाळी साडेअकराच्या सुमारास  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोरच रॉकेलचा डबा अंगावर ओतून घेतला. शेतकरी आत्मदहन करत असल्याचे दिसताच तेथे उपस्थित असलेले प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख, ज्येष्ठ पत्रकार महेश महाराज देशपांडे,  पोलिस कर्मचारी वसिम पठाण व सचिन गोरे यांनी तात्काळ शेतकर्‍याच्या दिशेने धाव घेत रॉकेलचा डबा व त्याच्या खिशात असलेली काडीपेटी ताब्यात घेतली. त्यामुळे शेतकर्‍याच्या आत्मदहनाचा  पुढील अनर्थ टळला.  

बुधवारीही एकाचा प्रयत्न

दरम्यान, वडिलोपार्जित जमीन काहींनी हिरावून घेतली असून, ती परत मिळावी, या मागणीसाठी वालचंदनगर येथील सचिन भीमराव समिंदर या युवकाने  बुधवारी (दि.21) सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. गेल्या दोन दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोनजणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.