Mon, Jun 17, 2019 15:16होमपेज › Ahamadnagar › आत्महत्या केली नाही.. लढलो.. म्हणूनच जिंकलो

आत्महत्या केली नाही.. लढलो.. म्हणूनच जिंकलो

Published On: Feb 05 2018 1:59AM | Last Updated: Feb 04 2018 11:21PMनगर  : प्रतिनिधी

स्वत:चं काहीच नव्हतं. आई-वडिलांनी दिलं, त्यातच भागवित होतो. मुलं मोठी झाली अन् त्यांच्या शिक्षणाची काळजी लागली. खिशात दमडाही नव्हता. मुला कॉलेजाला पैसे लागलीत म्हणून जमीन विकली. पैसे घरात कसे ठेवू म्हणून पतसंस्थेत ठेवले अन् तिथंच घात झाला. गेल्या 4 वर्षांत कित्तेकदा आत्महत्येचा विचार मनात आलता. पण  ‘पुढारी’अन् मित्रांनी साथ दिली म्हणून लढलो आणि जिंकलो...
शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची अनेक कारणे आपण आजवर जाणली आहेत. त्यात मुख्य कारण आहे, ते कर्जबाजारीपणाचे. असाच नगर जिल्ह्यातील, नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथील एक शेतकरी रघुनाथ शेवाळे. मुले मोठी झाली.

मुलाला अभियांत्रिकीला प्रवेश द्यावा, मुलीलाही चांगले शिकवावे. आपल्याप्रमाणे त्यांना शेतीत आयुष्यभर घाम गाळण्यापेक्षा त्यांना त्यांच्या पायावर उभे करावे, अशी इच्छा मनी बाळगली. पण प्रश्‍न होता तो पैशांचा. पुढच्या वर्षी मुलांच्या महाविद्यालयीन प्रवेशाला पैसे लागतील, म्हणून आधीच तरतूद करायचा निर्णय घेतला. आपल्याकडे तर पैसे नाही. मग पोट भरण्यापुरती जमीन स्वत:ला ठेवली आणि उरलेली विकली. सरकारी बँकेपेक्षा पतसंस्थेत  जास्त व्याज मिळेल, या अपेक्षेने जमिनीचे आलेले सगळे पैसे पत्नी आणि स्वत:च्या नावावर पतसंस्थेत ठेवले. 

पतसंस्थेच्या अध्यक्षांचे काही आडाखे चुकले आणि पतसंस्था अडचणीत आली. ठेवीदारांचे पैसे निर्धारित वेळेत परत करणे त्यांना काही कारणांमुळे शक्य झाले नाही. त्यामुळे ठेवीदार आणि संस्थाचालक असा संघर्ष उभा राहिला. त्याच संघर्षातील एक संघर्षग्रस्त शेतकरी म्हणजे रघुनाथ शेवाळे. सन 2013 मध्ये या घटना आणि संघर्षाला सुरूवात झाली. पतसंस्था अडचणीत आल्यानंतर शेवाळे दाम्पत्याने संस्थाचालकांकडे पैशांसाठी तगादा लावला. संस्थाचालकांकडे पैसे नसल्याने त्यांनी आश्‍वासने देण्यास सुरूवात केली. आधी धनादेश दिले. ते वटले नाहीत. मग पुन्हा तोच पायंडा. या संदर्भातील ‘पुढारी’मधील जागृतीबाबतची वृत्ते वाचून घाबरलेला शेतकरी ‘पुढारी’कडे आला. ‘पुढारी’च मला न्याय मिळवून देईल, अशी त्याची खात्री होती.

‘पुढारी’ने त्याला मार्गदर्शन केले. सहकारी खाते आणि न्यायालयाचा दरवाजा या शेतकर्‍याने ठोठावला. अगदी उच्च न्यायालयापर्यंतही धडक मारली. तरीही हाती काहीच लागत नव्हते. गेल्या 3/4 वर्षांतील सलग दुष्काळामुळे शेतीतही काहीच मिळत नव्हते. शेतात टाकलेल्या धान्याइतकेही धान्य घरात येत नव्हते. घर चालविण्यासाठी मित्र, नातेवाईकांचे उंबरठे झिजवले. कर्ज आणि मुले सोबतच मोठी होत होती. त्यांच्या शिक्षणाचा प्रश्‍न डोळ्यासमोर होता. पैसेच नसल्याने अभियांत्रिकीसाठीची तयारी केलेल्या मुलाला विज्ञान शाखेत पदवीचा प्रवेश घेऊन दिला. अपरिहार्यतेशिवाय डोळ्यांसमोर काहीच नव्हते. रोजच्या हाता-तोंडाची गाठ घालणेही मुश्किल झाले होते. अनेकदा आत्महत्येचे विचार मनात येत होते.

मात्र, ‘पुढारी’ अन् अ‍ॅड. शिवाजी सांगळे यांच्यासारखे मित्र भेटले. त्यांनी हिम्मत दिली, लढलो अन् जिंकलो. माझे पैसे मिळाले, पण उधार उसणवार्‍यांनाही ते पुरेसे नाहीत. मात्र आता जीवात जीव आला आहे, अशी कहाणी कथन करताना ‘पुढारी’चे आभार मानले शेतकरी रघुनाथ शेवाळे यांनी. आणि कोणाही शेतकर्‍याने आत्महत्येपेक्षा संघर्षाचाच मार्ग स्विकारावा, ‘देर है लेकीन अंधेर नही,’ या म्हणीचा मी अनुभव घेतलाय, असे सांगण्यासही ते विसरले नाही.

धीर धरा.. न्याय मिळेल..!

आर्थिक प्रकरणांत आपले पैसे लवकरात लवकर मिळावेत, अशी अपेक्षा प्रत्येकाला असते. नगर शहरातच नव्हे, तर राज्यात अनेक पतसंस्था बुडीत निघाल्या आहेत. प्रत्येक वेळेस संस्थाचालकच दोषी असतात असे नाही. मात्र, धीर धरल्यास नक्कीच न्याय मिळतो, असा विश्‍वास अ‍ॅड. शिवाजी सांगळे यांनी ‘पुढारी’शी बोलताना व्यक्‍त केला.