Mon, Sep 24, 2018 10:03



होमपेज › Ahamadnagar › बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांच्या तोंडाला शासनाने पुसली पाने

बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांच्या तोंडाला शासनाने पुसली पाने

Published On: Mar 04 2018 1:46AM | Last Updated: Mar 04 2018 1:02AM



नगर : केदार भोपे

बोंडअळीने जिल्ह्यात कपाशीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानुसार शासनातर्फे शेतकर्‍यांना मदत देण्यात येणार आहे. मात्र 33 टक्के पेक्षा कमी नुकसान झालेल्या शेतकर्‍यांची संख्या मोठी असतांना, असे शेतकरी नुकसानभरपाई पासून वंचित राहणार आहेत. नव्याने शासनाला अहवाल पाठविण्यात येणार असून, त्यानंतर आर्थिक मदत मिळेल. त्यानुसार जिल्ह्यात अवघ्या सात महसूल मंडलातील बोंडअळीग्रस्तांनाच मदत मिळणार आहे.

बोंडअळीने झालेल्या कापसाच्या नुकसानीचा अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविला होता. त्यानुसार जिल्ह्यातील तब्बल 1 लाख 42 हजार 735 हेक्टर क्षेत्र बोंडअळीच्या प्रादुर्भावाने बाधित झाले असून, त्याचा 1 हजार 85 गावातील 1 लाख 97 हजार 342 शेतकर्‍यांना फटका बसला आहे. एकूण बाधित क्षेत्रासाठी 157 कोटी 23 लाख रुपयांचा निधी जिल्ह्यासाठी आवश्यक असल्याचे शासनाला कळविण्यात आले होते. सुरुवातीला शासनाने नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली. मात्र त्यासाठी काढलेल्या शासन निर्णयाने शेतकर्‍यांच्या तोंडाला पानेच पुसली आहेत.

शासन निर्णयानुसार आता बोंडअळीने कापसाचे 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकर्‍यांनाच आर्थिक मदत देण्यात येणार आहे. शासन निर्णयानंतर जिल्हा प्रशासनाने 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेले क्षेत्र, त्याची रक्कम व शेतकर्‍यांची संख्या याचा स्वतंत्र अहवाल तयार केला आहे. हा अहवाल लवकरच राज्य शासनाला पाठविण्यात येणार आहे. हा अहवाल सात ते आठ कोटींचा असू शकतो.

जिल्ह्यात जवळपास दीड लाख हेक्टर कपाशीची लागवड झाली होती. त्यापैकी सुमारे 90 टक्के क्षेत्राला बोंडअळीने फटका दिला आहे. शेवगाव, पाथर्डी, नेवासा, श्रीरामपूर, जामखेड आणि कोपरगाव परिसरात कपाशीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते. शेवगाव, पाथर्डी, नेवासा हे तालुके ‘कॉटन बेल्ट’ म्हणून ओळखले जातात. बोंडअळीच्या प्रादुर्भावाने बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले होते. शासनाने बाधित जिरायती क्षेत्रासाठी हेक्टरी 6 हजार 800 रुपये तर बागायतीसाठी 13 हजार 500 रुपये अनुदान घोषित केले आहे.