Sun, May 26, 2019 13:02होमपेज › Ahamadnagar › ‘बाह्यवळण’च्या धुळीमुळे शेतजमिनी झाल्या नापिक

‘बाह्यवळण’च्या धुळीमुळे शेतजमिनी झाल्या नापिक

Published On: Dec 10 2017 1:17AM | Last Updated: Dec 09 2017 11:37PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

बाह्य वळण रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शेतकर्‍यांची जमीन नापिक झाली आहे. या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी खड्डेमुक्त बाह्यवळण समितीचे पदाधिकारी व  शेतकर्‍यांनी केली आहे. 

महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या नगर येथील उपप्रादेशिक कार्यालयात खड्डेमुक्त बाह्यवळण समिती आणि शेतकर्‍यांनी निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे, निकृष्ट कामामुळे नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गा ते नगर-मनमाड राज्य महामार्गाला जोडणार्‍या बाह्यवळण या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे धुळीचे लोळ दिवस-रात्र परिसरातील शेतामध्ये जात आहेत. केडगाव, नेप्ती, नालेगाव, बोल्हेगाव, निंबळक, इसळक, विळद आदी गावातील रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतकर्‍यांची जमिनी नापिक झाल्या आहेत. गहू, ज्वारी, हरभरा, ऊस, घास, पपई, डाळिंब आदी फळबागांचेही नुकसान झाले आहे. 

धुळीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. या रस्त्याच्या दुरवस्थेला जबाबदार असणार्‍या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांवर पर्यावरण कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर समितीचे अध्यक्ष दीपक शिरसाठ, उपाध्यक्ष कॉ. विकास गेरंगे, कॉ. भैरवनाथ वाकळे, मच्छिंद्र म्हस्के, विकास घोलप, राहुल ठाणगे, विजय कोतकर, अ‍ॅड. योगेश गेरंगे, महादेव गवळी, ह.भ.प.अजय बारस्कर आदींच्या सह्या आहेत.