Wed, May 22, 2019 22:33होमपेज › Ahamadnagar › जिल्ह्यात दहा हजार शेतकर्‍यांची फुलणार शेती

जिल्ह्यात दहा हजार शेतकर्‍यांची फुलणार शेती

Published On: Dec 25 2017 1:21AM | Last Updated: Dec 24 2017 11:02PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेमुळे जिल्हाभरातील दहा हजार शेतकर्‍यांचे शेतशिवार हिरवेगार होणार आहे. शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध होणार असल्याने खरीप व रब्बी पिकांची हमी मिळणार आहे. आर्थिकदृष्टया सबळ होण्यासाठी अल्पभूधारक शेतकर्‍यांना शेततळे हे एक वरदान ठरणार आहे. 

शेतपिकांना शाश्वत पाणी उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाने‘मागेल त्याला शेततळे’ ही महत्त्वाकांक्षी योजना गेल्या वर्षांपासून हाती घेतली आहे. सर्वसामान्य शेतकर्‍यांची जमीन पाण्यावाचून पडून राहू नये. या शेतशिवारात त्याला पिके घेता यावीत, यासाठी शाश्वत सिंचन असणारी ही वैयक्‍तिक लाभाची योजना कृषी विभागामार्फत राबविली जात आहे. गेल्या दोन वर्षांत मिळून शासनाने या जिल्ह्यासाठी 9 हजार 200 शेततळ्यांचे उद्दिष्ट दिले आहे. 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हाभरातून जवळपास 29 हजार 700 शेतकर्‍यांनी प्रस्ताव दाखल केले होते. त्यापैकी 21 हजार 412 शेतकरी पात्र ठरले. या पात्र शेतकर्‍यांपैकी 10 हजार 976 शेतकर्‍यांचा या योजनेत समावेश केला गेला. त्यानुसार त्यांच्या शेततळयांची आखणी देखील पूर्ण झाली. आजमितीस  6 हजार 378 शेततळी पूर्ण झाली असून, प्रत्यक्षात 544 शेततळ्यांचे कामे सुरू आहेत.

या योजनेसाठी  शासनाने शंभर टक्के अनुदान वितरित केले आहे. जिल्हाभरात या योजनेच्या माध्यमातून दोन वर्षांत 27 कोटी 54 लाख रुपयांचे अनुदान शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा देखील झाले आहे.मागेल त्याला शेततळे या योजनेत जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली आहे.

या योजनेचा सर्वाधिक लाभ कर्जत तालुक्याने घेतला आहे. त्याखालोखाल संगमनेर तालुक्यातील अल्पभूधारक शेतकर्‍यांनी देखील चांगला प्रतिसाद दिला आहे. शेततळे पूर्ण झाल्यास या तळयात पावसाचे पाणी साठून, शेतकर्‍यांना शाश्‍वत पाणी उपलब्ध होणार आहे. योजनेमुळे शेतकर्‍यांना खरीप हंगामासोबत रब्बी व उन्हाळी पिके घेणे देखील शक्य होणार आहे. या पाण्यामुळे पिकांच्या उत्पन्‍नात वाढ होवून आर्थिकदृष्टया सबळ होण्यास मदत होणार आहे. 

तालुकानिहाय अनुदानीत शेततळे -नगर-552, पारनेर-391, पाथर्डी-294, जामखेड-185, श्रीगोंदा-523, कर्जत-958, नेवासा-246, श्रीरामपूर-307, शेवगाव-132, राहुरी-176, संगमनेर-828, राहाता-398, कोपरगाव-434, अकोले-629.