होमपेज › Ahamadnagar › नीलेश लंके यांची पदावरून हकालपट्टी!

नीलेश लंके यांची पदावरून हकालपट्टी!

Published On: Mar 08 2018 1:49AM | Last Updated: Mar 07 2018 10:56PMपारनेर : प्रतिनिधी   

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत समर्थकांकडून झालेल्या बेशिस्त वर्तनाचे पर्यावसन अखेर नीलेश लंके यांच्या तालुकाप्रमुख पदावरून हाकालपट्टीत झाले आहे. पक्षप्रमुखांच्या आदेशावरून पक्षाचे सचिव खा. विनायक राऊत यांनी तालुकाप्रमुखपदी पंचायत समितीचे माजी सदस्य विकास भाऊसाहेब रोहकले यांची निवड केल्याची घोषणा केली.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर जिल्हा नियोजन मंडळाच्या निवडणुकीत लंंके यांनी पत्नी राणी लंके यांचा अर्ज दाखल करून विरोधकांच्या मदतीने विजय संपादन केला. त्यानंतर लंके तसेच आ. विजय औटी यांच्यात दुरावा निर्माण झाला. त्यानंतर लंके यांनी विरोधकांशी जुळवून घेतले. त्यावर उपतालुकाप्रमुख विकास रोहकले यांनी आक्षेप घेतल्यानंतर लंके समर्थक सोशल मीडियावर रोहकले यांच्यावर तुटून पडले. त्यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर आरोप करण्यात आले. हा वाद संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्यापर्यंत पोहचला. मात्र तोडगा निघू शकला नाही. 

आ. औटी यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यास पक्षप्रमुख ठाकरे उपस्थित होते. कार्यक्रमात लंके यांना खांद्यावर घेऊन, घोषणाबाजी करीत सभास्थळी पोहचलेल्या त्यांच्या समर्थकांचे वर्तन ठाकरे यांना रूचले नाही. पुढे ठाकरे हे सभा आटोपून हेलिपॅडकडे निघाले असता, त्यांचे अंगरक्षक बसलेल्या आ. औटी यांच्या वाहनावर दगडफेक झाली. ही गोष्टही ठाकरे यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी लंके यांच्यावर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. दोन्हीही जिल्हाप्रमुखांना मुंंबईत पाचारण करून घडलेल्या घटनेचा अहवालही घेण्यात आला. त्यानंतर लंके यांना तालुकाप्रमुख पदावरून दुर करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

काल सकाळीच सोशल मीडियावर हकालपट्टी झाल्याचे व्हायरल झाल्यानंतर लंके समर्थकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. तालुक्यातील अनेक शिवसैनिकांनी हंगे येथे लंके यांच्या घरापुढे गर्दी केली. लंके यांनी हंगे ग्रामपंचायतीच्या प्रांगणात आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून संयम बाळगण्याचे आवाहन केले. या रजकीय घडामोडीमुळे तालुक्यात त्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे आगामी काळात काय घडामोडी घडतील, याकडे लक्ष लागले आहे.